चाळीस टक्के प्रतिसाद : सीटी बसवाल्यांचाही सहभाग
प्रतिनिधी / वास्को
वास्कोत लॉकडाऊन जारी करण्यात यावा अशी मागणी सरकारकडून पूर्ण होत नसल्याने अखेर काल सोमवारी स्थानिक व्यापाऱयांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. वास्को शहरातील जवळपास चाळीस टक्के व्यापार बंद होता. पुढील पाच ते आठ दिवस हा बंद राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वास्कोतील नागरिक व व्यापाऱयांनी केले आहे.
वास्कोतील मांगोरहिल भागात कोरोनाचा उद्रेक झाल्याने मुरगाव पालिका मंडळासह वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, दाबोळीचे आमदार व मंत्री माविन गुदिन्हो, कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना तसेच वास्कोतील इतर नेत्यांनी व स्थानिक लोकांनीही संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांसाठी वास्कोत लॉकडाऊन जाहीर करावा अशी जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी वास्कोत येऊन पाहणी केली. लोकांची व नेत्यांची मागणी व समस्या ऐकून घेतल्या. परंतु लॉकडाऊनची मागणी पूर्ण केली नाही. त्यामुळे लॉकडाऊनचे समर्थन करणाऱया लोकांमध्ये नाराजी पसरली होती. जनभावना लक्षात घेऊन मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी वास्कोतील व्यापाऱयांनी स्वतःहून लॉकडाऊन करावे असे आवाहन केले होते. त्यातूनच बहुतेक व्यापाऱयांनी स्वतःहून बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी वास्कोत जवळपास चाळीस टक्के व्यवहार बंद राहिला. सीटी बसवाल्यांकडूनही प्रतिसाद मिळाला.
स्वंय घोषीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
सोमवारी सकाळपासून वास्को शहरात संपूर्ण भाजी मार्केटसह मुरगाव नगरपालिका मार्केट तसेच संडे मार्केट, टी. बी. कुन्हा चौकातील व्यवहार बंद राहिले. मासळी मार्केटही ओस पडले होते. मात्र, पालिकेच्या अखत्यारीत येणाऱया या मार्केटांमध्ये काही व्यापाऱयांनी आपली दुकाने खुली ठेवली होती. खासगी इमारतींतील दुकानदारांनी या बंदला फारसा प्रतिसाद दिला नाही. काही दुकानदारांनी स्वखुषीने दुकाने बंद ठेवली तर बहुतेकांनी उघडीच ठेवली होती. काही दुकानदारांनी सकाळच्या वेळी दुकाने उघडी केली. मात्र, नंतर काही व्यापाऱयांनी केलेल्या विनंतीनुसार त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी बंदला थोडा अधिक प्रतिसाद लाभला. मात्र, फारसा प्रतिसाद लाभला नसल्याने फारसी गैरसोयही झाली नाही.
शहराबाहेरील व्यवहार मात्र सुरळीत होते. फळभाजी मार्केटमधील काही विक्रेत्यांनी इतरत्र बस्तान मांडून लोकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापाऱयांनी स्वखुषीने अशा प्रकारे लॉकडाऊन पुकारलेला असून पुढील पाच ते आठ दिवस हा बंद राहणार आहे. पुढील काही दिवसांत किती प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे. शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाच्या भितीने लोकांची वर्दळ कमी झाली आहे. वास्कोतील काही सिटी बसवाल्यांनी बस वाहतूक सुरू ठेवली होती. बस प्रवासी मिळत नसल्याने बहुतेक बसमालक या बंदमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
मांगोरहिलबाहेरील रूग्णांची संख्या सहा
वास्कोतील मांगोरहिलमधील वस्तीतून सुरू झालेला कोरोनाचा उद्रेक अद्यापही शमलेला नाही. रूग्णांची संख्या वाढतच आहे. रविवारपर्यंत वास्कोतील इतर भागात तीन कोरोन रूग्ण सापडले होते. काल सोमवारी ही संख्या सहावर पोहोचली आहे. तर याच कुटुंबांतील काही जणांवर कोरोनाची टांगती तलवार आहे. आतापर्यंत नवेवाडे, ओरूले व शांतीनगर भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला होता. काल सोमवारी शांतीनगरात पुन्हा एक रूग्ण आढळून आला. हा रूग्ण मांगोरहिलच्या संसर्गाशी संबंधीत नसल्याचे बोलले जात असून त्याने परराज्यात प्रवास केलेला असल्याचे उघडकीस आलेले आहे.
पोस्ट खात्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ
वास्कोतील पोस्ट खात्यात झालेली कोरानाची लागण वाढत आहे. मांगोरहिल भागातील रहिवासी असलेल्या व पोस्टात काम करणाऱया दोघांपैकी एकटा कोरोना बाधीत झाला होता. त्यानंतर या पोस्ट कार्यालयातील आणखी एक नवेवाडे भागातील कर्मचारी कोरोनाबाधीत ठरला आहे. त्याचा भाऊही संशयाच्या घेऱयात सापडला असून त्याच्या चाचणीचा अहवाल आज उपलब्ध होणार आहे. नवेवाडेत राहणाऱया पोस्ट खात्यातील एका कर्मचाऱयाची पत्नी कोरोनाबाधीत झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, पोस्टमेन असलेल्या तिच्या पतीची चाचणी नकारार्थी आलेली आहे. या मांगोरहिल बाहेरील तीन नव्या रूग्णांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी दिली.
कोविड चाचणीसाठी नमुने घेणे पुन्हा सुरू
मांगोरहिल भागातील कंटेनमेंट झोनमधील बंद करण्यात आलेली कोविड चाचणीची प्रक्रिया काल सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता सरसकट सर्वाचीच चाचणी करण्यात येत नाही. ज्यांची चाचणी करणे खरोखरच आवश्यक आहे, अशा लोकांच्याच लाळेचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. सोमवारी दिवसभरात 30 नागरिकांचे नमुने घेण्यात आले. आतापर्यंत कोविड चाचणीसाठी तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या जवळपास एक हजार झालेली आहे. तर या नागरिकांच्या तपासणीत आतापर्यंत 230 हून अधिक कोरोना बाधीत सापडले आहेत. या वस्तीत उघडण्यात आलेल्या बाहय़ रूग्ण विभागात सोमवारी स्थानिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. मागच्या तीन दिवसांपासून ही सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तिचा लाभ लोक घेत आहेत. लोकांकडून आरोग्याच्या तक्रारी येऊ लागल्याने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.