प्रतिनिधी /वास्को
वास्कोत मुरगाव नागरिक शिमगोत्सवातील लोकनृत्य, रोमटामेळ व चित्ररथ मिरवणुकीला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. सायंकाळी सहाच्या सुमारास हुतात्मा चौकातून प्रारंभ झालेली ही मिरवणूक व चित्ररथ स्पर्धा रात्री अकराच्या सुमारास संपली.
यंदा भव्यदिव्य असे चित्ररथ मोठय़ा संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. लोकनृत्य, रोमटामेळ पथकेही सहभागी झाली होती. वेशभूषा स्पर्धकही होते. ओस्सय…ओस्सय, घुमचे कटर घुम….. घुमचे कटर घुम….. या ढोलताशांच्या निनादात हातात रंगीबेरंगी घुडय़ा, तोरणे व चौरंग घेऊन सहभागी झालेल्या रोमटामेळांनी अंत्यंत शिस्तबद्धरित्या पावली नाचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात श्री शांतादुर्गा लक्ष्मी-नृसिंह साखळय़ो संस्थान सांकवाळ, सावय वेरेंचो सख्याहरी, वास्कोतील फिटनेस फस्ट, खांडेपार शिमगोत्सव समिती खांडेपार, श्री गुरूकला मंडळ पिजगाळ, बार्देश शिमगोत्सव समिती, डोंगरी शिमगोत्सव मंडळ, श्री नवदुर्गा कला संस्कृती मंडळ मडकई, सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई फोंडा, सरस्वती कला मंडळ केळबाय कुटी फोंडा, श्री मंडलेश्वर माणागुरु शिमगोत्सव मंडळ वाजे शिरोडा, श्री स्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, कुडचडे काकोडा शिमगोत्सव समिती, बोरी शिमगोत्सव समिती बोरी, शांतादुर्गा शिमगोत्सव मंडळ कळंगूट, सावर्डे शिमगोत्सव मंडळ, श्री पाईकदेव शिमगोत्सव समिती सांगे आदी रोमटामेळ शिमगोत्सवात सहभागी झाली होते. पौराणिक कथावर आधारित विविधांगी, एकापेक्षा एक आकर्षक चलचित्रित भव्य दिव्य व डोळय़ांचे पारणे फेडणारे असे चित्ररथ भावणारे आणि सुंदर कलाविष्कार घडवणारे होते.
स्वतंत्रपथ मार्गाच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी या मिरवणुकीचा आस्वाद घेतला. या मिरवणुकीत आकर्षक चित्ररथाबरोबरच रोमटामेळ पथके तसेच गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोककला पथके आणि वेषभूषा स्पर्धकांचा सहभाग होता.