प्रतिनिधी / वास्को
वास्को शहर व परीसरात सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजलेले आहेत. किराणा दुकाने, सुपर स्टोअर, बँका आणि फळ भाजी विक्रीच्या ठिकाणीही दाटीवाटी वाढत आहे. काल सोमवारी वास्को शहरात काही ठिकाणी संचारबंदी उठवल्यासारखी स्थिती होती.
कालचा सोमवारचा दिवस असल्याने व लॉकडाऊनचा काळ संपण्याचा दिवस जवळ आल्याने लोकांमध्ये उत्साह दिसून आला. या उत्साहात लोकांना सामाजीक अंतर पाळण्याचेही भान राहिले नाही. रस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणात वर्दळ राहिली. किराणा दुकानदार, भाजी आणि फळविक्रेते तसेच बँकासमोरही दाटीवाटीने गर्दी राहिली. मासळी मार्केट ओस होते. परंतु या मार्केटबाहेर फळ भाजी विक्रेतेच दाटीवाटीने बसून बाजार चालवत होते. त्यामुळे या बाजारात गर्दी पडली होती. दुपारपर्यंत हाच प्रकार चालू होता. शहराबाहेरही हीच परिस्थिती होती. त्यामुळे वास्कोत सोशल डिस्टनसिंगचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. ज्याची नितांत गरज आहे, तोच नियम पायदळी तुडवला जात असून पोलिसांनी अशा प्रकारांविरूध्द कडक पावल उचलण्याची गरज आहे.