भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्सव समितीकडून यंदाही निर्बंध, मुरगाव पालिकेची मात्र, फेरीसाठी जोरदार तयारी
प्रतिनिधी /वास्को
श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव यंदा दि. 3 ऑगष्ट रोजी साजरा होणार आहे. उत्सव समितीने भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून यंदाही गर्दी टाळण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. मुरगाव पालिकेने मात्र प्रचंड गर्दी खेचणाऱया फेरीच्या भव्य आयोजनासाठी जोरदार तयारी चालवली आहे. त्यामुळे उत्सव समितीचा भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा हेतू असफल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. उत्सव समितीने उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी भाविकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
सोमवारी श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीने उत्सवासंबंधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या चोवीस तासांच्या भजनी सप्ताहासंबंधीत रूपरेषा मांडली. मागची दोन वर्षे कोरोना प्रसाराच्या भितीने अगदी साध्या पध्दतीने भजनी सप्ताह साजरा करण्यात आला. भाविकांच्या देवदर्शनावरही निर्बंध आले होते. त्यामुळे यंदा हा उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी समिती कार्यरत आहे. तरीही पुढे संसर्गाची साथ पसरू नये यासाठी उत्सव समितीने काही निर्बंध घातलेले असून भाविकांसाठी देवदर्शन खुले असले तरी मंदिरात गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत अशी माहिती समितीने यावेळी दिली. श्री दामोदर भजनी सप्ताहानिमित्त दि. 2 ऑगस्ट रोजी श्री दामोदर पुनःप्रतिष्ठापना दिनी सायंकाळी 7 वा. मंदिरासमोर उभारलेल्या मंडपात खास संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव समितीतर्फे यावेळी गायक जयतिर्थ मेहुंडी (धारवाड) यांना आमंत्रीत करण्यात आलेले असून त्यांना ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर, हार्मोनियमवर दत्तराज म्हाळशी, तबल्यावर अजिंक्य जोशी (पुणे), पखवाजवर प्रथमेश तारळकर (पुणे) व मंजिरीवर योगेश रायकर साथसंगत करतील. श्री दामोदर भजनी सप्ताहात दि. 3 रोजी रात्री 9 वा. नटराज थिएरजवळ होणाऱया खास संगीत मैफलीसाठी गायक ऋषिकेश बडवे यांना आमंत्रीत करण्यात आले. त्यांची मैफल दि. 3 रोजी रात्री 9 ते 10.30 या वेळेत होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर दत्तराज सुर्लकर, तबल्यावर शैलेश गांवकर, पखवाजवर किशोर तेली तर मंजिरीवर योगेश रायकर साथसंगत करतील. रात्री 12 वा. जोशी चौकातील वास्को टॅक्सी स्टॅण्डजवळ गायक ऋषिकेश बडवे यांची दुसरी बैठक होईल.
उत्सव समितीने दिलेल्या माहितीनुसार यंदा केवळ बाजारकर समाज म्हणजेच उत्सव समितीचा पार, दींडी व गायनाच्या बैठका असतील. इतर ज्ञाती समाजाना तयारीसाठी वेळ मिळाला नसल्याने पारच्या तसेच गायन, दिंदी आदींच्या आयोजनांसाठी असमर्थता व्यक्त केलेली आहे. मात्र, काही समाजांचा अद्यापही दिंडी पार गायन आदी कार्यक्रमांसाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्सव समितीनेही त्यांच्यासाठी तयारी ठेवलेली आहे.
3 रोजी भजनी सप्ताहा दिवशी दुपारी 12 वा. दामोदराच्या चरणी श्रीफळ अर्पण करून भजनी सप्ताहाला विधिवत सुरवात होईल. मात्र, यंदा मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी 2 वा. पर्यंत भाविकांना देवदर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मर्यादीत उपस्थितीत भजनी सप्ताहाचा प्रारंभीचा विधी होईल. चोवीस तासांचे अखंड भजन यंदा विविध भजनी मंडळांतर्फे प्रत्यक्ष सादर करण्यात येईल. मात्र, भजन सादर करण्यासाठी मर्यादीत कलाकारांनाच प्रवेश देण्यात येईल. भजनी सप्ताह समाप्तीचा गोपाळ काला मंदिरा ऐवजी बाहेरील खुल्या मंडपात होणार आहे. यंदाचा भजनी सप्ताह उत्साहात पार पडावा यासाठी उत्सव समिती प्रयत्नरत आहे. मात्र, कोरोनासंबंधीत नियमांचे भाविकांनी पालन करावे. प्रत्येकाने मास्क परीधान करूनच मंदिरात प्रवेश करावा. सामाजीक अंतराचे पालन करावे. गर्दी गोंधळ टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकही असतील. त्यांना सहकार्य करावे व भजनी सप्ताह निर्विध्न पार पाडण्यासाठी शिस्तीचे दर्शन घडवावे असे आवाहन उत्सव समितीने भाविकांना केले आहे.
दरम्यान, उत्सव समितीने भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी यंदा तिसऱया वर्षीही गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू केलेले असले तरी मुरगाव पालिकेने मात्र, प्रचंड गर्दी खेचणाऱया भव्य फेरीच्या आयोजनासाठी कंबर कसलेली आहे. फेरीचे नियोजनही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे यंदा वास्को शहरात गर्दी उसळणार हे निश्चित आहे. विशेषता मंदिराभोवती भरणाऱया फेरीमुळे सप्ताह उत्सव समितीचा भाविकांवर निर्बंध लादण्याच्या उध्देशालाही बाधा येणार आहे. उत्सव समितीने मात्र, फेरीचे आयोजन हा भाग पूर्णपणे नगरपालिकेचा असल्याचे सांगून त्या आयोजनाशी उत्सव समितीचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. फेरीवर काही प्रमाणात निर्बंध असावेत तसेच ही फेरी मंदिरापासून दूर असावी अशी विनंती पालिकेला करण्यात आल्याची माहितीही उत्सव समितीने दिली.
या पत्रकार परिषदेत उद्योजक प्रशांत जोशी, उत्सव समितीचे अध्यक्ष जयंत सोनुर्लेकर व सरचिटणीस संतोष खार्जुवेकर यांनी उत्सवासंबंधी माहिती देऊन भाविकांना सहकार्याचे आवाहन केले. यावेळी विनायक घोंगे, विष्णू गारूडी, शेखर खडपकर, रघुनाथ खोब्रेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.