प्रतिनिधी / वास्को
लॉकडाऊनमध्येही वास्को व परिसरात उपलब्ध होणारी दारू कुठून व कशी येते याची पोलखोल रविवारी झाली. वास्कोतील अबकारी खात्याच्या पथकाने धाड घालून खोलांत येथील एका घरातून 9 लाख रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
मुरगाव तालुक्याचे अबकारी निरीक्षक सालेलकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या गेल्या महिन्याभरातील काळात अबकारी खात्याने सबंध मुरगाव तालुक्यात मद्य विक्रीच्या व्यवसायावर कडक नजर ठेवली होती. त्यामुळे कुठेही खुलेआम विक्री दिसून आली नाही. परंतु बोगमाळोजवळील खोलांत या भागात एका घरात गैरमार्गाने मद्य विक्री होत आहे, अशी तक्रार अबकारी खात्याकडे रविवारी आली. त्यामुळे अधिक चौकशी करून खोलांत येथील त्या घरावर अबकारी खात्याच्या वास्कोतील पथकाने धाड घातली.
मद्य व्यवसायिकाचा परवाना निलंबीत
त्या घरात 9 लाख रूपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. हा मद्यसाठा 319 खोक्यांमध्ये होता. तो जप्त करून या कारवाईची माहिती राज्याच्या अबकारी आयुक्तांना देण्यात आली. जप्त करण्यात आलेला मद्यसाठा मोले चेक नाक्यावर पाठवण्यात आलेला असल्याची माहिती सालेलकर यांनी दिली. कारवाई करण्यात आलेल्या मद्य व्यवसायिकाचा परवानाही निलंबीत करण्यात आलेला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात गैरमार्गाने दारू विक्री करणाऱयांनी अबकारी खात्याच्या कारवाईपासून सावध राहावे असा सल्ला दिला आहे. गैरमार्गाने दारू विक्री आढळून आल्यास सिल ठोकण्याची कारवाई हाती घेण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.