तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
प्रतिनिधी /वास्को
वास्को काँग्रेसच्या चौदा कार्यकर्त्यांनी पक्षाच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने आतापर्यंत दिलेली अन्यायकारक वागणुक, केलेले दुर्लक्ष व असहकार्याच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिलेली असून हे सर्व कार्यकर्ते वास्को गट समितीमधील माजी पदाधिकारी व काँग्रेसचे नेते सैफुल्ला खान यांचे समर्थक आहेत. हा गट तृणमुल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे वास्को गटाचे माजी अध्यक्ष इम्रान शेख, पदाधिकारी श्रीमती मांद्रेकर व हुसेन खान यांनी काँग्रेसच्या प्राथमीक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सांगून त्यांनी राजीनामा देण्याची कारणेही मांडली. यावेळी एकूण चौदा जणांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली. यापैकी काही जण जवळपास पंचवीस वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या कार्यात होते. येत्या निवडणुकीत वास्कोच्या हितासाठी आम्ही आम्हाला योग्य वाटेल अशाच उमेदवाराला पाठींबा देऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आम्ही गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षासाठी कार्य केलेले आहे. मात्र, सध्या पक्षात गोंधळ माजलेला असून हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही पक्षाच्या नेत्यांना वारंवार विनंती केली होती. मात्र, नेत्यांनी आमच्या विनंतीकडे दुर्लक्षच केले. आमच्याकडे सतत दुर्लक्ष तसेच आम्हाला विश्वासात न घेणे अशा अन्यायकारक वागणुकीमुळे आम्ही पक्षाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी या माजी पदाधिकाऱयांनी सांगितले. येत्या दोन दिवसांत पुढील निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाची विचारसरणी पुढे चालवणाऱया उमेदवारालाच आम्ही पाठींबा देऊ असेही म्हटले आहे.
दरम्यान, सदर कार्यकर्त्यांचा गट मागच्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस नेते सैफुल्ला खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते. ते सैफुल्ला खान यांचे समर्थक असून या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे सैफुल्ला खान तृणमुल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.