प्रतिनिधी/ वास्को
आदर्शनगर चिखली येथील विद्या मंदिर शाळेजवळपासच्या परीसरात तीन कारसह अन्य काही वाहने आगीच्या भडक्यात सापडण्याची घटना सोमवारी पहाटे घडली. वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाने बरेच प्रयत्न करून अनेक वाहने वाचवण्याची कामगीरी बजावली. मात्र, या घटनेत लाखोंची हानी झाली.
या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार विद्या मंदिर हायस्कुल असलेल्या परीसरातील त्या रस्त्यावर अनेक चार चाकी व दुचाकी वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजुला पार्क करण्यात येत असतात. या अनेक वाहनांपैकी मारूती व्हॅगनर कारमध्ये आगीची ठिणगी पडली आणि ती कार पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्या ठिकाणी वाहने दाटीवाटीने पार्क करण्यात आलेली असल्याने बाजुच्या एका स्विफ्ट कारलाही आगीची झळ बसून ती कारही पूर्णपणे खाक झाली. अशाच प्रकारे आणखी एक कार पूर्णपणे जळाली. तसेच एक मिनी टेम्पो व पाच दुचाकी अर्धवट जळाल्या तर काही वाहनांची किरकोळ हानी झाली. ही घटना सोमवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास घडली. ही घटना व्हगनर कारमध्ये शॉर्ट सर्किट होऊन घडली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वास्कोतील शासकीय अग्नीशामक दलाने या घटनेची माहिती मिळताच त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तेथील रस्त्यावर दोन्ही बाजुनी वाहने पार्क करण्यात आलेली असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी दलाला बरेच कष्ट घ्यावे लागले. तोपर्यंत तेथील वाहनांची त्या आगीत बरीच हानी झाली होती. अग्नीशामक दलाने तरीही अनेक वाहनांना आगीपासून वाचवले व अधिक हानी रोखली. आग विझवीण्याची ही कामगीरी सकाळी साडे पाचच्या सुमारास संपुष्टात आली.