प्रतिनिधी / वास्को
आतापर्यंत पाचशेहून अधिक कोरोना बाधितांची संख्या गाठलेल्या वास्को व परिसरातील एका रूग्णाला सोमवारी रात्री मृत्यू आल्याने संवेदनशील वातावरणात मंगळवारी अधिकच भर पडली. आता वास्कोवासियांमध्ये धाकधुक वाढली आहे. मात्र, वास्कोतील व्यवहार सुरळीत असून लोकांची वर्दळ पूर्वीपेक्षा कमीच दिसत आहे.
मांगोहिलमधील बाधितांची संख्या काल मंगळवारी 327 होती. सडय़ावरील कोरोना बाधितांनी आता अर्धशतक गाठले आहे. सडय़ावरील आकडा सतत वाढत आहे. खारवीवाडा भागातील एका रूग्णाचे सोमवारी रात्री मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याने आता कोरोनाच्या भितीने वेगळे वळण घेतलेले आहे.
मयताची पत्नी पॉझिटीव्ह तर मुले सुरक्षीत
वास्को खारवीवाडा भागातील मयत व्यक्ती या भागातील पारंपरिक रहिवासी असून काही दिवसांपूर्वी त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झालेली असून तिलाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. या कुटुंबातील तरूण असलेल्या दोघांही मुलाना कोरोनाची बाधा झालेली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. मात्र, धोका टाळण्यासाठी या भागातील नागरिकांची कोविड तपासणी होणे आवश्यक असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
मुरगावच्या कस्टम हाऊसमध्ये खळबळ
मुरगाव हार्बर येथील कस्टम हाऊसच्या एका कर्मचाऱयाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने हा विभाग पुढील 48 तासांसाठी सील करण्यात आला. कार्यालयाचे निर्जंतुकीकरणही करण्यात आले आहे. कोरोना बाधीत कर्मचाऱयाच्या इतर सहकाऱयांना वर्क फ्रॉम होमचा आदेश देण्यात आला आहे.