प्रतिनिधी / वास्को
पालिका निवडणुकीच्या निमित्ताने वास्को, मुरगाव व दाबोळी विधानसभा मतदारसंघात पुन्हा भाजपाने वर्चस्व सिध्द केले आहे. मागच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर पालिका निवडणुकीतही भाजपाने या तिन्ही मतदारसंघांमध्ये मतदारांचा कौल प्राप्त केला आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीपासून मुरगाव तालुका भाजपाच्या बाजुनेच राहिलेला आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने कुठ्ठाळीसह मुरगाव वास्को व दाबोळीतही विजय प्राप्त केला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत कुठ्ठाळीत फटका बसला होता. मात्र, दाबोळी वास्को व मुरगावमध्ये वर्चस्व राखले होते. मुरगावच्या पालिका निवडणुकीतही ही परंपरा राखली गेली आहे. मुरगाव पालिका क्षेत्रात वास्को, मुरगाव व दाबोळी असे मुरगाव तालुक्यातील तीन मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात भाजपाचे एकूण एकोणीस उमेदवार निवडून आले आहेत. वास्कोतील 12 प्रभागांपैकी भाजपाला 9 प्रभागात विजय मिळाला. मुरगावात 7 प्रभागात विजय मिळाला तर दाबोळीमध्ये 4 पैकी तिन प्रभागात विजय मिळाला. त्यामुळे भाजपाला एकूण 19 नगरसेवकांचे बळ प्राप्त झाले आहे. अपक्ष जिंकलेले नगरसेवक लियो रॉड्रिक्स हे मंत्री मिलिंद नाईक यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी दाबोळीतील प्रभागात निवडणुक लढवली होती. माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांनी लियो रॉड्रिक्स यांना अपक्ष निवडून आणण्यात महत्वाची भुमीका बजावली. या विजयाचे श्रेय क्रितेश गावकर यानाच जाते. तसेच दुसरे अपक्ष नगरसेवक धनपाल स्वामी हेसुध्दा भाजपा समर्थक आहेत. त्यामुळे भाजपाचे मुरगाव पालिकेतील अप्रत्यक्ष बळ 21 आहे. पालिकेत असे यश प्रथमच एखादय़ा राजकीय पक्षाला प्राप्त झालेले आहे.
पालिका निवडणुकीत भाजपाला विक्रमी यश मिळाल्याने मुरगाव पालिका मंडळात विरोधी गट कमकुवत ठरण्याची शक्यता आहे. विरोधी गटाचे जबाबदारी आता संकल्प आमोणकर गटाच्या श्रध्दा आमोणकर व योगीता पार्सेकर या नगरसेवकांवर तसेच दाजी साळकर यांच्या शमी साळकर व गिरीष बोरकर या नगरसेवकांवर पडणार आहे.
मंत्री-आमदारानीही सिध्द केली क्षमता
वास्को, मुरगाव व दाबोळीतील भाजपाच्या मंत्री अमदारांनी पुन्हा आपली क्षमता सिध्द केली आहे. पालिका निवडणुकीत मुरगावमध्ये विजयी झालेल्या भाजपाच्या उमेदवारांमध्ये सातपैकी सहा नगरसेवक नवखे आहेत. वास्कोमध्ये भाजपाचे पाच नगरसेवक नवखे आहेत तर दाबोळीत भाजपाचे तिन्ही नगरसेवक नवखे आहेत. या नवख्या उमेदवारांना निवडून आणण्याचे सारे श्रेय मंत्री मिलिंद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो तसेच आमदार कार्लुस आल्मेदा यानाच जाते. वास्को मतदारसंघात तर आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सर्वानाच धक्का दिला. त्यांनी पंधरा वर्षांपूर्वीच्या नगरसेविका देविता आरोलकर यांनाही एक हाती जिंकून आणले. त्यांनी वास्कोतील 12 प्रभागांपैकी 11 प्रभागांमध्ये उमेदवार उभे करून 9 उमेदवारांना मोठय़ा मताधिक्क्याने जिंकून आणले. दीपक नाईक व फॅड्रीक हेन्रीक्स यांना पुन्हा जिंकून आणण्यातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. नवखे चेहरे असूनही वास्को मुरगाव व दाबोळीमध्ये या उमेदवारांनी मोठय़ा मताधिक्क्याने विजय प्राप्त केला. या यशासाठी त्यांचे आमदार व भाजपाचे बळ कामी आले.
निर्विवाद यश मिळाल्याचा आनंदच- मंत्री मिलिंद नाईक
नगरविकासमंत्री व मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी मुरगाव पालिका निवडणुकीत खास करून मुरगाव मतदारसंघात मिळालेल्या यशाबद्दल बोलताना 9 पैकी 7 प्रभागांमध्ये विजय मिळाल्याचा आनंद आहेच परंतु 2 जागा हातातून निसटल्या याचाही खेद होत असल्याचे सांगितले. निर्विवाद बहुमत मिळाल्याने मुरगाव पालिकेत भाजपा सत्ता स्थापन करणार आहे. नगराध्यक्षपदी कुणाची निवड करावी या गोष्टी बैठक होऊन ठरेल. भाजपा व सरकार प्रमुख या विषयावर विचार करून निर्णय घेतील असे मंत्री मिलिंद नाईक यांनी स्पष्ट केले.
9 जागांवर विजय हा जनतेने दाखवलेला विश्वास – आमदार कार्लुस आल्मेदा
वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी जनतेने आपल्या उमेदवारांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे म्हटले आहे. मागच्या पालिका निवडणुकीत 8 प्रभागात आपल्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला होता. यंदाच्या निवडणुकीत 11 पैकी 9 जागांवर विजय मिळाला आहे. काही चुकांमुळे दोन जागा हातच्या गमवाव्या लागल्या आहेत. अन्यथा शंभर टक्के यश मिळाले असते. पालिका क्षेत्रातील वास्को, मुरगाव व दाबोळी अशा तिन्ही मतदारसंघात भाजपाला यश मिळालेले आहे. या मतदारसंघात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा यश मिळणार आहे. पालिका मंडळात भाजपाची सत्ता येईल. पक्षाचे नेते नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडण्याबाबत तिन्ही आमदारांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतील असे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले.