प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील सेंट ऍण्ड्रय़ू चर्चसमोरील हुतात्मा चौकात सिग्नल यंत्रणा बंद पडल्यास आता जवळपास वीस वर्षे झाली आहेत. ही यंत्रणाच आता गंजून जमीनीवर कोसळण्याची शक्यता निर्माण झालेली असून गेली वीस ही यंत्रणा हटवण्याची तसदी कुणी घेतलेली नाही.
वीस वर्षांपूर्वी वास्को शहरातील हुतात्मा चौकात होणाऱया अपघातांची दखल घेऊन या चौकात वास्को शहरातील पहिलीच सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. त्यापूर्वी वास्को शहर व परीसरात कुठेच वाहतुक सिंग्नल यंत्रणा नव्हती. चार दिशांनी सहा रस्ते असलेला हा हुतात्मा चौक पूर्वी अपघात प्रवण म्हणूनच ओळखला जात होता. वाहने क्रॉसिंगची गंभीर समस्या या ठिकाणी होती. या समस्येवर उतारा म्हणून सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, या व्यवस्थेमुळे बराच वेळ वाया जाऊ लागल्याने आणि काही तांत्रीक कारणांमुळे ही यंत्रणा अवघ्या दोन वर्षातच बंद करावी लागली. त्यानंतर या चौकांतील एक क्रॉसिंग बंद करून ही समस्या वेगळय़ा प्रकारे हाताळण्यात आली. त्यात यशही आले. आता हुतात्मा चौकांत अपघात घडत नाहीत.
ही समस्या सुटली तरी त्या ठिकाणी उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणेचा खर्च मात्र वाया गेला. त्या सिग्नलचे खांब हटवण्याचीही तसदी मागच्या सोळा सतरा वर्षात कुणी घेतली नाही. हे खांब गंजून सध्या वाकलेले आहेत. चौकातील सिग्नलचे दोन्ही खांब भयावह स्थितीत असून पादचाऱयांना या खांबांपासून धोका आहे. हे खांब त्या ठिकाणी ऐवढी वर्षे का ठेवण्यात आले हा प्रश्नच आहे. धोका टाळण्यासाठी सिग्नलचे खांब त्वरीत हटवण्याची गरज आहे.