प्रतिनिधी /वास्को
वास्को शहर व परीसरातील काही इमारती धोकादायक अवस्थेत असून या इमारती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या धोकादायक इमारतींमध्ये मुरगाव पालिकेच्या मालकीच्याही इमारती असून या गंभीर समस्येकडे सतत दुर्लक्ष झालेले आहे. वास्कोतील शहर भागाच्या नगरसेविका शमी दाजी साळकर यांनी नुकतेच मुख्याधिकाऱयांचे या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
वास्को शहरात पालिकेच्या मालकीच्या काही इमारती आहेत. देखभालीअभावी या इमारतींची वाईट अवस्था झालेली आहे. काही इमारतींचे स्लॅब अधूनमधून कोसळत असतात. या इमारती रस्त्यांच्याकडेलाच असल्याने वाहतुकीला आणि पादचाऱयांना धोका निर्माण होऊ शकतो. सुदैवाने अद्याप कुणालाही इजा झालेली नाही. मात्र, या इमारतींची धोकादायक अवस्था पाहता कधी तरी या इमारती धोका देऊ शकतात. पालिकेच्या इमारतींबरोबरच काही खासगी इमारतींही वास्को शहरात धोकादायक अवस्थेत असून या इमारती आता पडीक बनून आहेत. तर काही इमारतींमध्ये लोक तशाच अवस्थेत दिवस काढीत आहेत. या धोकादायक इमारतींमुळे लोकांच्या जीवालाही धोका असल्याने पालिकेने आपल्या मालकीच्या इमारतींसह इतर खासगी इमारतींचीही गंभीर दखल घ्यावी व त्या इमारती पाडण्यासाठी पावले उचलावीत. वास्को शहर विभागाचे माजी नगरसेवक दाजी साळकर व विद्यमान नगरसेवक शमी साळकर यांनी या प्रश्नाकडे यापूर्वी पालिकेचे लक्ष वेधले होते व आता पुन्हा एकदा यासंबंधी पालिकेकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष झालेले आहे.
शहरातील स्वातंत्र्य पथ मार्गावर असलेल्या जनता बिल्डींगची स्थिती अत्यंत वाईट असून या इमारतीखालून चालायला सध्या मनाई आहे. ही इमारत कोसळत असल्याने फुटपाथ रोखण्यात आलेली असून पादचाऱयांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.