प्रतिनिधी / वास्को
वास्को शहरात जनता कर्फ्युच्या दुसऱया दिवशी सोमवारी जै थे स्थिती राहिली. रविवार प्रमाणेच सोमवारीही सकाळच्या वेळी वर्दळ व दुपारपासून सामसुम अशी परिस्थिती शहरात होती. मात्र, जास्त गर्दी खेचणारे शहरातील भाजी मार्केट पोलिसांनी खुले करू दिले नाही.
वास्को शहर व परीसरात काल दुसऱया दिवशीही लोकांची व वाहनांची बरीच वर्दळ राहिली. दुपारपर्यंत किराणा दुकाने व भाजी मार्केट खुली ठेवण्यात येत असल्याने लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे सरकारने कर्फ्यु लावल्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. दुपारी एक वाजल्यानंतर मात्र, रविवार प्रमाणेच सर्वत्र शांतता व सामसुम वातावरण निर्माण झाले. शहरातील बरीच हॉटेल्सही पूर्णपणे बंद होती. केवळ फार्मसी व पेट्रोल पंप तेवढे खुले होते. प्रवासी वाहतुकही बंद होती. वाहतुकीची वर्दळ तुरळक होती. मात्र, सकाळची वर्दळ सोडल्यास दुसऱया दिवशीही कर्फ्यु यशस्वी ठरला.
शहरातील फळभाजी मार्केट पूर्णपणे बंद
फळ भाजी मार्केटला कर्फ्युमधून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे वास्को शहरातील फळभाजी मार्केट रविवारी सकाळी ते दुपारपर्यंत खुले होते. सोमवारी मात्र, पोलिसांनी हे मार्केट खुले करू दिले नाही. या मार्केटमधील बहुतेक व्यापारी आणि ग्राहकही कोरोनासंबंधीत नियमांचे उघडपणे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आलेले आहे. या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पडत असते. रविवारीही असाच प्रकार होता. हा प्रकार कोरोना प्रसाराला आमंत्रण देणारा असल्याने पोलिसांनी हे मार्केट पूर्णपणे बंद ठेवण्यास भाग पाडले व त्या ठिकाणी पोलीस पहाराही ठेवला. त्यामुळे या मार्केटमध्ये सोमवारी दिवसभर सामसुम होती.