प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव पालिकेने मागच्या तीन दिवसात वास्को शहरातील 59 बेवारस वाहने हटवली. या वाहनांमध्ये दुचाकी, तीन चाकी, चार चाकी अशाच बहुतेक वाहनांचा समावेश आहे. शहराबाहेरील वाहनेही अशाच पध्दतीने हटवण्यात येतील असे मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.
वास्को शहरात गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ठिकाणी बेवारस वाहने पडून होती. ती हटवण्याचा प्रयत्न कुणीच केला नव्हता. मात्र, हल्लीच मुरगाव पालिकेने तसेच वास्कोच आमदार दाजी साळकर व वाहतुक पोलिसांनी गांभिर्याने घेतला होता. ही वाहने मालकांनी स्वताहून हटवण्यासाठीही जागृती करण्यात आली होती. मात्र, शेवटी अशी वाहने क्रेन लावून पालिकेलाच उचलावी लागलेली आहेत. सतत तीन दिवस ही कारवाई करण्यात आली. दुचाकी, रिक्षा, कार व इतर गाडय़ा एकूण 59 वाहने बऱयाच कष्टाने उचलावी लागली. यात भंगार अवस्थेतील गाडय़ांची संख्या अधिक आहे. यात सरकारी वाहनांचाही समावेश आहे. मुरगावचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स तसेच उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर व काही नगरसेवकांनी या कारवाई वेळी जातीने उभे राहून मार्गदर्शन केले. बेवारस वाहने उचलण्यात आल्याने शहरात बऱयाच ठिकाणी रस्त्याच्याकडेच्या जागा खुल्या झालेल्या आहेत. या मोहिमेसाठी आमदार दाजी साळकर तसेच वाहतुक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर व त्यांच्या पोलिसांनी सहकार्य केल्याचे सांगून नगराध्यक्षांनी त्यांचे आभार मानले. तर या कारवाईबाबत लोकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
अशाच प्रकारे शहराबाहेरील पालिका क्षेत्रात बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांविरूध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे. त्याच बरोबरच शहरात पार्कींग व्यवस्थेतही सुधारणा होण्याची गरज असून लवकरच ठिकठिकाणी फलक लावण्यात येणार आहेत. चुकीच्या पध्दतीने वाहने पार्क करणाऱयांविरूध्द कडक कारवाईसुध्दा हाती घेण्यात येईल. पुढील आठवडाभरात ही कारवाई सुरू होईल. त्यामुळे पार्किंग व्यवस्थेला शिस्त लागेल असे नगराध्यक्षांनी सांगितले.