राज्य सरकारचा निर्णय उद्या होणार शिक्कामोर्तब
प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारने अखेर नवा वाहतूक कायदा 15 जानेवारीपासून गोव्यात लागू करण्याचे ठरविले आहे. गोव्याने त्यासाठी गुजरात मॉडेलची जशीच्या तशी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हा यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सदर वृत्तास दुजोरा दिला. वाहतूकमंत्र्यांनी वाहतूक खात्याचे अधिकारी तसेच इतर काही अधिकाऱयांच्या दरम्यान सोमवारी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला. उद्या दि. 30 डिसेंबर रोजी राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत गोव्यात नवा राष्ट्रीय वाहतूक कायदा लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या अनुषंगाने वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी पूर्व आढावा विषयक बैठक घेतली.
यापुढे किमान दंड रु. 500 असणार
काही राज्यांनी नव्या वाहतूक कायद्याची अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी त्यांनी नमके कोणते निकष लावले याचा अभ्यास करता गुजरात हाच योग्य पॅटर्न असल्याचे निदर्शनास आले. केंद्र सरकारने नवा वाहतूक कायदा करताना दंडात्मक कारवाईमध्ये दहा ते 25 पटीने वाढ सूचविली आहे. त्यामध्ये कोणताही दंड हा किमान 500 पासूनच सुरु होणार आहे. सध्या छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी रु. 100 पासून दंडात्मक कारवाई सुरु होते. यानंतर नव्या कायद्यानुसार किमान दंड हा रु. 500 राहील.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, 30 डिसेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वाहतूक कायद्यासंदर्भात जी अधिसूचना जारी करण्यात येईल त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणखीन 15 दिवसांची मुदत राहील. त्यानुसार 15 जानेवारीपासून गोव्यात या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.