फोंडय़ात दोघे ट्रकचालक कोरोनाबाधीत आढळल्याने सतर्कता आवश्यक
प्रतिनिधी / फोंडा
आठवडय़ाभरात फोंडा तालुक्यात जे तीन कोरोनाबाधीत रुग्ण सापडले, त्यापैकी दोघे परराज्यातील ट्रकचालक आहेत. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ते माल घेऊन आले होते. परराज्यातून येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असे बेरच ट्रकचालक माल घेऊन येतात. वाहतूक कार्यालयांशी त्यांचा संपर्क येतो. शिवाय जेवणाखाण्यासाठी ते ढाब्यांवर जातात. त्यामुळे वाहतूक कार्यालये व ढाबाचालकांनी आता अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. दिवसाकाठी किती ट्रकचालक व क्लिनरनी वाहतूक कार्यालयांना भेटी दिल्या त्यांची सविस्तर माहिती देण्याची सक्ती सरकारी यंत्रणाना करावी लागेल.
फोंडा तालुक्यात बुधवारी जो पहिला कोरोनाबाधीत रुग्ण सापडला तो ट्रकचालक मूळ उत्तरप्रदेश येथील असून आपल्या कुटुंबीयांसह वडाला मुंबई येथे राहणारा आहे. बेतोडा येथील एका भंगार अड्डा मालकाच्या ट्रकवर तो चालक आहे. गुजरात येथून भंगाराचे सामान घेऊन तो बेतोडय़ात आला होता. बोरी-बेतोडा बगलरस्त्यावरील एका ढाब्याजवळ तो थांबला होता. तेथेच त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आली. दुसरा कोरोनाबाधीत ट्रकचालक शनिवारी कुर्टी-बेतोडा बगलरस्त्यावर सापडला. तो सांगली येथील आहे. येथील एका औद्योगिक वसाहतीमध्ये तो माल घेऊन आला होता.
फोंडा शहराच्या सभोवताली असलेले बगलरस्ते तसेच कुंडई, मडकई, बेतोडा व उसगाव औद्योगिक वसाहती मिळून साधारण तिनशेच्या आसपास वाहतूक कार्यालये आहेत. औद्योगिक वसाहतींमध्ये कच्चा माल घेऊन येणारे व तयार माल घेऊन जाणाऱया देशभरातील विविध राज्यातील शेकडो ट्रकांचा या वाहतूक कार्यालयांशी संपर्क येतो. सध्या लॉकडाऊनमुळे फोंडय़ात येणाऱया मालवाहू ट्रकांची संख्या घटली तरी धोका मात्र टळलेला नाही. फोंडय़ात पोचल्यानंतर हे ट्रक संबंधीत वाहतूक कार्यालयाशी संपर्क साधतात. तसेच माल खाली केल्यानंतर दुसरे भाडे मिळेपर्यंत बगलरस्त्याच्या बाजूला किंवा वाहतूक कार्यालयांजवळ मुक्काम ठोकतात. या काळात जेवणाखाणासाठी जवळच्या ढाब्यावर त्यांचा संपर्क येतो. त्यामुळे वाहतूक कार्यालये व ढाबाचालकांना आता खबरदारी घ्यावी लागेल. कवळे व इतर ग्रामपंचायतींनी आपापल्या पुढाकार घेऊन आपल्या हद्दितील वाहतूक कार्यालये व ढाब्यांना तशा सूचना केल्या आहेत. संबंधीत सरकारी यंत्रणांनीही आता खबरदारीसंबंधी कडक पावले उचल्यण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात फोंडा तालुक्यात साधारण दिडशेच्या असपास ट्रकचालक अडकून पडले होते. 14 एप्रिल म्हणजेचे लॉकडाऊन शिथिल होईपर्यंत येथील वाहतूक कार्यालयांशी संबंधीत व्यावसायिकांनी व काही स्वयंसेवी संस्थानी या ट्रकचालकांच्या जेवणाखाणाची सोय केली होती. आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाहतूक कार्यालयांशी संबंधीत लोकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. एखादा ट्रकचालक किंवा क्लिनर संशयास्पद आढळून आल्यास ही माहिती न लपवता तात्काळ आरोग्य पथकाशी संपर्क साधून सहकार्य करावे लागेल. परराज्यातून येणाऱया ट्रकचालकांची सविस्तर माहिती घेऊन गरज पडल्यास सरकारी यंत्राणांना ती पुरवावी लागेल. अशी खबरदारी न घेतल्यास वाहतूक कार्यालयातील व्यावसायिकांबरोबरच, ढाबेचालक व इतर लोकांनाही संसर्गाचा धोका आहे.