वाहनाच्या विम्याचा वाढीव हप्ता भरावा लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱयांना चांगलाच भुर्दंड बसणार आहे. आगामी काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयांना वाहनाच्या विम्यासाठी वाढीव रकमेचा हप्ता भरावा लागू शकतो. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडून (आयआरडीए) स्थापन एका कार्यकारी समितीने वाहतूक उल्लंघन प्रीमियम लागू करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसी मंजूर झाल्यास भविष्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयांना वाहनाच्या विम्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
वाहन विम्यात वाहतूक उल्लंघन प्रीमियमही सामील करण्यात यावा अशी शिफारस कार्यकारी समितीने केली आहे. कार्यकारी समितीने याकरिता वाहन विम्यात पाचवा भाग जोडण्याची शिफारसही केली आहे. सद्यकाळात वाहन विम्याच्या हप्त्यात ऑन डॅमेज इन्शोरन्स, थर्ड पार्टी इन्शोरन्स, ऍडिशनल थर्ड पार्टी इन्शोरन्स आणि कंपलसरी पर्सनल ऍक्सिडेंट प्रीमियमही सामील केला जातो.
एनआयसीकडून माहिती मिळणार
समितीच्या शिफारसीनुसार मद्यपान करून वाहन चालविण्यापासून चुकीच्या ठिकाणी पार्किंग करण्यासारख्या विविध उल्लंघनाच्या आधारावर वाहतूक उल्लंघन प्रीमियम निश्चित करण्यात यावा. विमा कंपन्यांना वाहतूक उल्लंघनावर झालेल्या दंडाची माहिती नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरकडून (एनआयसी) प्राप्त होईल.
…तर 100 पॉईंट पेनल्टी
शिफारसीनुसार मद्यपान करून वाहन चालविल्यास 100 अंकांची पेनल्टी लावण्यात येईल. तर चुकीच्या ठिकाणी पार्किंग केल्यास 10 अंकांची पेनल्टी बसणार आहे. वाहतूक उल्लंघन प्रीमियमची रक्कम याच पेनल्टी अंकांशी संलग्न असणार आहे. वाहन विक्री केल्यास खरेदीदारासाठी वाहतूक उल्लंघन प्रीमियम शून्यापासून सुरू होणार आहे.
सूचना मागविल्या
विमा नियामक आयआरडीएने कार्यकारी समितीच्या शिफारसींसंबंधी मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यावर आयआरडीएने सर्व संबंधित घटकांकडून 1 फेब्रुवारीपर्यंत सूचना मागविल्या आहेत. मसुद्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनांचे प्रमाण आणि त्याच्या गांभीर्याच्या गणनेसाठी एक व्यवस्था निर्माण करण्याची बाब नमूद आहे. यात वाहतूक नियमांच्या अधिक उल्लंघनाला विम्याच्या हप्त्याशी जोडण्याचा मुद्दा सामील आहे.
9 सदस्यीय समिती
आयआरडीएकडून प्रसिद्ध मसुद्यानुसार कार्यकारी समितीत एकूण 9 सदस्य होते. यात दिल्ली वाहतूक पोलीस, विमा कंपनी, आयआरडीए आणि इन्शोरन्स इन्फॉर्मेशन ब्युरोचे (आयआयबी) अधिकारी सामील आहेत. एचडीएफसी एर्गो जनरल इन्शोरन्स कंपनी लिमिटेडचे चीफ ऍक्चुअरी अँड चीफ अंडररायटिंग ऑफिसर अनुराग रस्तोगी या समितीचे अध्यक्ष होते.