प्रतिनिधी / गडहिंग्लज
24 कॅरेटचे सोने बाजारभावापेक्षा कमी दराने देतो, असे सांगून गडहिंग्लज आगाराचे वाहतूक निरीक्षक राजेश मातले यांना अमित कांबळे (रा. बोरगाव, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या भामटय़ाने 10 लाख रुपयाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा फिर्याद नोंदविण्यात आली.
सोने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असून 24 कॅरेटचे सोने बाजारभावापेक्षा 200 ते 250 रु. कमी दराने घेऊन देतो, असे अमित कांबळे याने माजी सैनिक व गडहिंग्लज आगाराकडील वाहतूक निरीक्षक राजेश मातले (वय 47, रा. पांगीरे, ता. भुदरगड) यांना सांगितले. फेब्रुवारी 2019 मध्ये मार्केट यार्ड गडहिंग्लज येथे व 20 जून 2019 रोजी हडलगे (ता. हुक्केरी) येथे राजेश मातले यांच्याकडून 10 लाखाची रक्कम सोने खरेदीसाठी कांबळे याने घेतली. ही रक्कम श्री. मातले यांनी पगारातून साठवून शिल्लक ठेवली होती. दोन दिवसात सोने आणून देतो असे सांगणाऱया अमित कांबळे याने सोनेही दिले नाही. तसेच पैसेही परत दिले नाहीत. याबाबत वारंवार विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास हवालदार पी. बी. गोंजारे करीत आहेत.
कोऱया कागदाची बंडले…
श्री. मातले यांनी पोलिसात तक्रार करतो असे सुनावल्यानंतर कांबळे याने 20 जून 2019 रोजी सायंकाळी हडलगे गावच्या हद्दीत आजरा-निपाणी रोडवर एका हॉटेलसमोर भेटून एक बॅग आणून दिली. यामध्ये तुमचे पैसे आहेत, असे मातले यांना सांगितले. त्यांनी घरी बॅग पाहिली असता त्यात बंडले होती. मात्र बंडलावर एक 100 रुपयाची नोट व आतमध्ये केरे कागद होते. कांबळे याला फोन केला असता चुकून तुमच्याकडे बॅग आली असून तुमचे पैसे परत देतो पोलिसात जाऊ नका, असे सांगितले. त्यानंतर सोने किंवा पैसे मिळाले नाहीत, असे मातले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.