कणकवलीतील घटना : वाहतूक नियम मोडल्याने कारवाईनंतर युवकाचे कृत्य
कणकवली:
दुचाकीवरून चुकीच्या बाजूने व विना लायसन फिरत असल्याबाबत विचारणा केल्याच्या रागाने युवकाने चक्क वाहतूक पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून माचीसद्वारे त्यांना पेटविण्याचाही प्रयत्न केला. या प्रकारानंतर युवकाने पळण्याचाही प्रयत्न केला. मात्र न. पं. कर्मचारी व पोलिसांनी त्याला रोखले. ही घटना येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
दरम्यान तेथे पोलिसांच्या साथीने ‘विना मास्क’बाबत कारवाई करणाऱया न. पं. चे कर्मचारी व अन्य काहींनी युवकाला रोखून बाजूला केले. त्यानंतर त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत विसंगत माहिती देणारा, आपले वय 18 वर्षे असल्याचे सांगणारा तो युवक पुढे पोलिसांच्या तपासणीत अल्पवयीन असल्याचे उघड झाले.
पोलीस, न. पं. पथक होते कार्यरत
कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस विश्वजीत परब व चंद्रकांत माने हे आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे नेहमीप्रमाणे डय़ुटी बजावत होते. तर कणकवली नगर पंचायतीच्या पथकाचे रवींद्र म्हाडेश्वर व प्रवीण गायकवाड हे कर्मचारी देखील विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई करण्यासाठी तेथे होते.
‘राँग साईड’मुळे कारवाई
सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास एक युवक येथील डीपी रस्त्याकडून आप्पासाहेब पटवर्धन चौकाच्या दिशेने ‘सर्व्हिस रोड’वरून ‘राँग साईड’ने स्कुटी दुचाकी (एमएच 07 एएम 3750) घेऊन येत होता. त्याला पाहून न. पं. कर्मचारी म्हाडेश्वर, गायकवाड यांनी त्याला थांबवले व परब, माने यांच्याकडे इशारा केला. परब यांनी युवकास बोलावून घेतले. चौकशी केली असता युवकाकडे लायसन नव्हते. परब यांनी लायसन व ‘राँग साईड’ने येत असल्याबाबत काही दंड भरायला सांगितला.
युवकाने हुज्जतही घातली
युवकाने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यावर परब, माने यांनी युवकाला काहीसे सुनावले. पण, युवकानेही पोलिसांशी हुज्जत घातली. अखेरीस पोलिसांनी ई – चलनाद्वारे ‘अनपेड’ दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर युवक तेथेच दुचाकी ठेवून निघून गेला. जाताने त्याने दुचाकीच्या डिकीमधील 100 रुपयांची नोटही नेली, हे न. पं. कर्मचारी म्हाडेश्वर यांनी पाहिले.
अचानक पेट्रोल ओतले
अवघ्या काही वेळातच हा युवक मागे आला. यावेळी त्याच्या हातात पेट्रोल भरलेली बाटली होती. काही समजायच्या आतच त्याने बाटलीतील पेट्रोल वाहतूक पोलीस परब, माने यांच्यासह न. पं. कर्मचारी गायकवाड यांच्यावर फवारले. त्याचवेळी हातात असलेली माचीसची पेटी उघडून त्याने काडी पेटविण्याचाही प्रयत्न केला. नेमक्या याच सुमारास तेथे उपस्थित आरोग्य कर्मचारी भालचंद्र साळुंखे यांनी पाहिले अन् त्याला रोखले.
युवकाला पकडले
त्यानंतर पळण्याचा प्रयत्न करणाऱया त्या युवकाला साळुंखे, न. पं. कर्मचारी, म्हाडेश्वर यांनी पकडले. तोपर्यंत तेथे नागरिकही गोळा झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साळुंखे, म्हाडेश्वर यांनी युवकाला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात युवकाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, सुरुवातीपासूनच युवकाकडून विसंगत माहिती मिळत होती. पेट्रोल ओतण्याचे कृत्य का केले, याची तो वेगवेगळ कारणे सांगत होता.
कर्मचाऱयांना रुग्णालयात दाखल
दरम्यान घडल्या प्रकारानंतर धास्तावलेले वाहतूक पोलीस विश्वजीत परब, चंद्रकांत माने, न. पं. कर्मचारी प्रवीण गायकवाड यांना तात्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांचीही प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली.
नागरिकांची रुग्णालयात धाव
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, बंडू गांगण, न. पं. कर्मचारी किशोर धुमाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, राजू गवाणकर आदींनी रुग्णालय गाठत पोलीस, न. पं. कर्मचारी यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
युवकाकडून खोटी माहिती!
पोलीस चौकशीत युवकाकडून विसंगत माहिती दिली जात होती. सुरुवातीला युवकाने आपले नाव, राहत्या तालुक्याचे नाव खोटे सांगितले. तसेच आपले वयही 18 वर्षे सांगितले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या चौकशीत युवक अल्पवयीन असल्याचे समजल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच तो काहीसा विमनस्क वाटत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.