सासरे व मेव्हुण्यालाही मारहाण, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ सातारा
मुलीला सतत मारहाण करत असल्यामुळे जावयाची समजूत घालायला आलेल्या सासूवर जावयाने चाकूने वार करुन जखमी केले. तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या सासरे व मेव्हुण्यालाही मारहाण केली. याप्रकरणी सातारा वाहतूक शाखेत कार्यरत असणाऱया लक्ष्मण साठेवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 10 रोजी 12 वाजण्याच्या सुमारास धनगरवाडी (ता. सातारा) येथे सौ. सविता लक्ष्मण साठे यांच्या घरी लक्ष्मण हणमंत साठे (वय 45), श्याम हणमंत साठे (वय 50), राज हणमंत साठे, गणेश चंद्रकांत खुडे, सुनिता राम साठे, मीना हणमंत साठे सर्व रा. धनगरवाडी, ता. सातारा आणि सौ. सविता साठे यांच्यात वाद होत होते. हे वाद मिटावेत म्हणून सौ. सविता यांची आई सौ. लता दिलीप चव्हाण (रा. चाफळ, ता. पाटण) या आपल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. यावेळी लता चव्हाण यांचे पती दिलीप, मुलगी सौ. सविता व मुलगा राहुल यांना वरील सहा जणांनी संगनमत करून हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केली. गणेश खुडे याने राहुल व दिलीप यांना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण साठे यांनी हातात चाकू घेऊन सासू लता दिलीप चव्हाण यांच्यावर चाकूने वार केला. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, लक्ष्मण साठे सातारा वाहतूक शाखेत असून ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने रजेवर होते. त्याच काळात घरात ही घटना घडल्याचे समजते.