प्रतिनिधी / कोल्हापूर, मुंबई
कोल्हापूर शहर वाहतुक नियंत्रण शाखेत पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणाऱया मधुकर मारुती चौगुले यांना पोलिस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाले आहे. याबद्दल पोलीस दलातील, हॉकी व फुटबॉल संघातील सहकारी, अधिकारी वर्ग, इतर पोलीस मित्र, नातेवाईक, मित्रपरिवारातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
त्यांनी आपल्या 34 वर्षांच्या पोलिस दलातील सेवेमध्ये कॉन्स्टेबलपासून ते पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंतचा चढता आलेख ठेवला आहे. त्यांनी गुन्हेगारी विश्वातील अनेक कुविख्यात गुंडांच्या टोळीला जेरबंद करून कामागार नेते दत्ता सामंत, कोल्हापूरातील भैय्या महाडिक व चंदगड येथील गाजलेल्या बांदिवडकेर खून खटल्यातील गुन्हेगारांना अटक करण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे. चौगुले यांच्याकडून खून, जबरी चोरी, घरफोडी, हत्यारे जप्त केली आहेत. तसेच त्यांनी 1985 ते 1993 या काळात कोल्हापूर पोलिस हॉकी व फुटबॉल संघात चमकदार कामगिरी बजावली असून संघाला सातवेळा चॅम्पियनशिप मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाच्या हॉकी संघाचे अनेकवेळा कर्णधार पदही भूषविले आहे. महाराष्ट्र पोलीस हॉकी संघात उत्कृष्ट गोलकिपर म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
34 वर्षात 275 बक्षीसांनी गौरव
मधुकर चौगुले यांनी 34 वर्षांच्या सेवेमध्ये वेळोवेळी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा 275 बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आहे. त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.
राज्यातील 54 पोलीस-अधिकारी कर्मचाऱयांना राष्ट्रपती पोलीस पदक
प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱया राष्ट्रपती पोलीस पदकांची शनिवारी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 54 पोलीस अधिकारी-कर्मचाऱयांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील 10 जणांना राष्ट्रपतीचे शौर्य पदक, चार जणांना विशेष सेवेसाठी तर 40 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये सिंगापूर येथे इंटरपोलमध्ये कार्यरत असलेले धनंजय कुलकर्णी, ताडदेव येथील शस्त्रास्त्र विभागात कार्यरत असलेले नंदकुमार ठाकुर, मोटार वाहन विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अतुल पाटील, विशेष शाखा 1 चे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे, राज्य एटीएसचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्टिव्हन ऍन्थोनी, विशेष शाखा 1 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मुकुंद पवार, खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन काब्दुले, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची सांगली पोलीस निरिक्षक संभाजी सावंत यांचा समावेश आहे.