ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासोबतच वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज केल्या.
विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची चतुर्थ बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे.
तसेच या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले.