तत्परतेने तपासणीची कार्यवाही
गोवा, सिंधुदुर्ग प्रशासनाकडून दखल
प्रतिनिधी / बांदा:
राज्याच्या विविध भागातून विशेषतः मुंबई-पुणेसारख्या रेड झोनमधून गोवा येथे मालवाहतूक करणाऱया ट्रकना गोव्यात प्रवेश देण्यासाठी सुमारे एक दिवसाचा वेळ लागत होता. परिणामी ट्रकचालक व क्लिनर बांद्यात खरेदीसाठी फिरत होते. त्याबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेत वाहनांची तपासणी जलदगतीने हाती घेतली. सद्यस्थितीत गोव्यात वाहन प्रवेशासाठी जलद कार्यवाही केली जात असून त्यामुळे वाहनांची कोंडी दूर झाली आहे. तपासणी नाक्यावर केवळ एक ते दोन वाहने तपासणीसाठी दिसत आहेत.
अलिकडेच लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट दिल्यानंतर मोठय़ा प्रमाणात मालवाहतूक करणाऱया वहनांची गोव्याच्या दिशेने रिघ लागत होती. गोवा सीमेवरून इन्सुली येथील तपासणी नाक्यापर्यंत वाहनांची रांग लागली होती. तर गोव्यात प्रवेशासाठी एका वाहनाला किमान एक दिवस घालवावा लागत होता. गोवा राज्य कोरोनामुक्त असल्याने गोवा सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला वेळ लागत होता. परिणामी गोव्यात जाणाऱया मालवाहू गाडय़ांच्या रांगा बांदा-इन्सुलीवासीयांसाठी डोकेदुखी ठरत होत्या. यातील जास्तीत जास्त वाहने मुंबई, पुणे यांसारख्या रेड झोनमधून येत होत्या. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीती होती.
‘तरुण भारत’ने ‘रेड झोनमधील ट्रकचालकांचा बांद्यात मुक्त संचार’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन जागे झाले. याबाबत तातडीने कार्यवाही करत वाहनांची गर्दी कशी कमी होईल, याकडे विशेष लक्ष दिले. तर काही वाहने दोडामार्गमार्गे पाठविली. तर वाहनांना जिह्यात प्रवेश देण्यावरही मर्यादा घालण्यात आल्या. गोवा प्रशासनानेसुध्दा बांद्यात होणारी गर्दी पाहता जलदगतीने कार्यवाही सुरू केली. त्यामुळे महामार्गावर असलेला वाहनधारकांची गर्दी कमी झाली.