दशावतार मंडळांचे आरटीओला निवेदन
वार्ताहर / कुडाळ:
कोरोनामुळे मार्चपासून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दशावतारी नाटके बंद आहेत. त्यामुळे दशावतारी मंडळांची वाहने उभी आहेत. काही वाहनाचे पासिंग संपले आहे. त्यामुळे शासनाने या वाहनांच्या कर आकारणीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दशावतारी मंडळांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (सिंधुदुर्ग) यांच्याकडे केली आहे.
दशावतार मंडळांच्या वाहन पासिंगसाठीच्या अटी शिथिल कराव्यात. तसेच व्यवसाय करात सवलत मिळावी, यासाठी दशावतारी लोककला चालक-मालक बहुउद्देशीय संघ (सिंधुदुर्ग) च्या पदाधिकारी व सदस्यांनी तेली यांच्या उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट देऊन परिवहन अधिकारी यांच्याशी चर्चा केली. कोरोनामुळे या कलेवर आलेल्या आर्थिक संकटाची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. दशावतारी लोककला चालक-मालक संघाचे अध्यक्ष तुषार नाईक, उपाध्यक्ष नाथा परब (नालंग), सचिव सचिन पालव, खजिनदार देवेंद्र नाईक, सुधाकर दळवी, सुवर्णकुमार मोचेमाडकर, बाबा मेस्त्राr, सोनू दळवी, वैभव तोटकेकर आदी उपस्थित होते. संघाच्यावतीने निवेदनही सादर करण्यात आले.
व्यवसाय पूर्णपणे ठप्प
कोरोनाने जगभर थैमान घातले. त्यामुळे सर्व व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला आहे. कोकणातील पारंपरिक दशावतार कलेलाही त्याचा मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात आज 70 ते 80 दशावतार मंडळे कार्यरत आहेत. साधारणतः ऑक्टोबर ते मे असा दशावतार कलेचा हंगाम असून मार्च 2020 पासून आजमितीपर्यंत हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. केव्हा सुरू होईल, याचीही शाश्वती नाही.
अटी शिथिल कराव्यात
परंतु दरवर्षीप्रमाणे या मंडळांची वाहने पासिंग करण्याची मुदत जवळ-जवळ संपत आलेली आहे. पण कोरोनाच्या या काळात हा व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आर्थिक घडी विसकटली आहे. ही वाहने पासिंग करणे सर्व चालक-मालकांना कठीण आहे. आमच्या मंडळांची वाहने पासिंग करताना असलेल्या अटी शिथिल कराव्यात. तसेच काही करांमध्ये (व्यवसाय कर) सुध्दा सवलत मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.