उपदव्यापिमुळे वाहनधारक हैराण, बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या विषाणुमुळे मागील दीड वर्षापासून शहरवासीय मेटाकुटीस आले आहेत. व्यवसाय नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण अशातच काही माथेफिरूंनी वाहनाच्या काचा आणि आरसे फोडण्याचा उपद्रव चालविला आहे. त्यामुळे या माथेफिरूचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
महाद्वाररोड, तानाजी गल्ली, जुना धारवाड रोड अशा विविध परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या काचा किंवा आरसे फोडण्याचा उपदव्याप माथेफिरूंनी चालविला असल्याची तक्रार होत आहे. सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवसाय थंडावले आहेत. अशात वाहनांच्या दुरूस्तीसाठी खिसा रिकामी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या परिसरात वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे याची माहिती नागरिकांना मिळत नाही. चुकून एखाद्या वाहनामुळे आरशाची काच फुटली असावी अशा समजुतीने नागरिक तक्रार करीत नाहीत.
पण दररोज वेगवेगळय़ा परिसरात वाहनांच्या आरशाच्या काचा फोडण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. महाद्वाररोड परिसरातील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या तसेच जुन्या धारवाड रोड येथील उड्डाणपुलाखाली पार्क करण्यात आलेल्या वाहनांच्या आरशाच्या काचा फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनांच्या मुख्य काचेवर तसेच आरशाच्या काचेवर रात्रीच्यावेळी मद्यधुंद अवस्थेत लोखंडी रॉडने मारून काचा फोडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. विशेषता दुचाकी वाहनांना लक्ष्य करण्यात आल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. वाहनांच्या काचा फोडणाऱया उपद्व्यापिंचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.