एक कार, रोख रकमेसह इतर साहित्य जप्त
प्रतिनिधी/ पणजी
विविध राज्यातील चारचाकी व दुचाकी वाहनांची चोरी करुन गुजरात, राजस्थान येथे दारु व ड्रग्स तस्करांना विकणाऱया एका टोळीला पर्वरी पोलिसांनी गुजरात सीआयडी पोलिसांच्या साहाय्याने गाजाआड केले आहे. त्यांच्याकडून एक कार, 37 हजार रुपये रोख रक्कम तसेच गाडय़ांच्या चाव्या व ग्लास कटरही जप्त केला आहे. संशयितांना गुजरात येथे अटक केल्यनंतर गोव्यात आणून रिमांडसाठी न्यायालयात हजार केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या संशयितांमध्ये श्रावण कुमार (24), राम जीवन (29), अरविंद कुमार (32), कृष्णा कुमार (24) यांचा समावेश आहे. चारही संशयित राजस्थान येथील आहेत. अजित बस्वराज यांनी सांगोल्डा येथून अज्ञात चोरटय़ांनी जीए-05-एफ-8800 क्रमांकाची महिंद्रा स्कॉरपीओ कार चोरल्याची 22 मे रोजी पर्वरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
उत्तर गोवा अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे, पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर, उपनिरीक्षक सीताराम मळीक, हवालदार संदीप परब, कॉन्स्टेबल महादेव नाईक, प्रजोत परब याबाबत तपास करीत असताना त्यांनी गोवा महाराष्ट्र महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असता चोरी केलेली कार गोव्याबाहेर जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. संशयितांची माहिती मिळवली व त्यांचे फोन लोकेशन तपासले असता संशयित राजस्थान येथे असल्याचे आढळून आले. पर्वरी पोलिसांनी आपला मोर्चा राजस्थानला वळविला. पोलीस राजस्थानला पोहचले असता संशयित गुजरात भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. पर्वरी पोलिसांनी गुजरातला जाऊन तेथील सीआयडी पोलिसांच्या साहाय्याने संशयितांना अटक केली. सोपस्कार पूर्ण करून त्यांना गोव्यात आणले. संशयितांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पर्वरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.