वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवासी वाहन निर्मात्या कंपन्या आता आगामी काळात वाहननिर्मितीला वेग देणार आहेत, असे सांगितले जात आहे. मार्च तिमाहीपर्यंत कार उत्पादनात 18 ते 20 टक्के वाढ केली जाणार असल्याची माहिती आहे.
डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत सेमीकंडक्टरच्या अपुऱया पुरवठय़ामुळे वाहन उत्पादनावर परिणाम झाला होता. अनेक कंपन्यांनी ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये वाहनांचे उत्पादन घटवले होते. उत्पादन वाढवून कोरोनापूर्व काळाइतके करण्याचा इरादा कंपन्यांनी वर्तविला आहे. त्यादृष्टीने आता कंपन्यांनी पावले उचलण्याचे ठरवले आहे.
मारुती सुझुकी वाढवणार उत्पादन
आघाडीवरची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी येत्या मार्चपर्यंत 4 लाख 90 हजार प्रवासी वाहनांचे उत्पादन घेणार आहे. डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 4 लाख 32 हजार 368 वाहनांचे उत्पादन घेतले होते. देशातील दुसरी सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी हय़ुंडाईला मात्र अद्यापही उत्पादनात वाढ करण्याबाबत अडथळे जाणवत असल्याचे समजते. सेमीकंडक्टरचा पुरवठा सुरळीत नसल्याने हय़ुंडाई कंपनीने उत्पादन वाढीचा विचार सध्या तरी बाजुला ठेवला आहे. उत्पादन वाढीबाबतचे चित्र एक दोन महिन्यात कंपनीकडून स्पष्ट होऊ शकतं. येत्या काळात इतर कंपन्याही उत्पादन वाढीवर भर देतील, असे जाणकार सांगत आहेत.
डिसेंबर तिमाहीत विक्री घटली
जागतिक सेमीकंडक्टर टंचाईमुळे प्रवासी वाहनांच्या उत्पादनावर परिणाम जाणवला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत 7 लाख 61 हजार प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. जी मागच्या वषी समान तिमाहीत 8 लाख 98 हजार इतकी होती. पाच वर्षातील ही सर्वात मोठी घट मानली जात आहे.