‘फॉक्सवॅगन’नंतर आता ‘टोयोटा’नं सरकारी धोरणांवर तीर सोडलाय अन् ‘रिव्हर्स गिअर’चंही दर्शन घडवलंय…दुसरीकडे अमेरिकेची विख्यात ‘हार्ले डेव्हिडसन’ नि ‘हिरो मोटोकॉर्प’ हे भागीदार म्हणून एकत्र येण्याची चिन्हं दिसायला लागलीत…
वाहन क्षेत्रातील याच घडामोडींविषयी…
वाहन क्षेत्रातील जपानची जगप्रसिद्ध कंपनी ‘टोयोटा’नं येऊ घातलेल्या दिवसांत भारतीय ग्राहकांना नवीन ‘कार्स’चं दर्शन न घडविण्याचा निर्णय जाहीर केलाय. शिवाय कंपनीनं नव्या कारखान्यात गुंतवणूक न करण्याचं देखील ठरविलंय…जपानी आस्थापनानं सारा दोष दिलाय तो मोदी प्रशासनाच्या धोरणांना…‘टोयोटा’च्या मतानुसार, वाहनांवरील परवडणार नाही इतक्या जास्त, आवाक्याबाहेरच्या करांमुळं परिणाम झालाय तो ग्राहकांच्या खरेदीवर (‘पेट्रोल’, ‘सीएनजी’, ‘एलपीजी’वर चालणाऱया 1200 सीसीपर्यंतच्या प्रवासी वाहनांवर एकंदरित 29 टक्के, तर ‘डिझेल’वरील 1500 सीसीपर्यंतच्या प्रवासी वाहनांसाठी 31 टक्के आणि 3500 सीसीपर्यंतच्या दुचाक्यांसाठी 31 टक्के)…या पार्श्वभूमीवर कंपन्यांवर पाळी आलीय ती वाढलेल्या खर्चाला व वापरण्याची संधी न मिळाल्यानं ‘न्यूट्रल गिअर’मध्ये प्रवास करण्याच्या परिस्थितीला तोंड देण्याची…
‘टोयोटा’नं म्हटलंय की, कराच्या दरांनी भारतातील ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ला बोथट बनविलंय. त्यामुळं ग्राहकांना सामोरं जावं लागतंय ते महाग ‘मॉडेल्स’ना. त्याखेरीज खप घसरल्यानं आस्थापनांना उद्योगातील सुप्त गुणांचा वापर करणं शक्य होत नाहीये…‘वाहन क्षेत्रानं एखादं पाप केलेलं नाही. या ‘सेक्टर’नं मोठय़ा प्रमाणात नोकऱयांची निर्मिती केलीय, निर्यातीला प्रोत्साहन दिलंय आणि प्रतिष्ठेला जन्म दिलाय’, ‘टोयोटा किर्लोस्कर मोटर्स’चे उपाध्यक्ष शेखर विश्वनाथन यांचे तिखट शब्द…काही दिवसांपूर्वी आपल्या देशातील ‘वाहन क्षेत्रा’संबंधी, भारतातील आव्हानांविषयी जर्मनीच्या ‘फॉक्सवॅगन’नं देखील नाराजी व्यक्त केली होती. तरी सुद्धा कंपनीनं 8 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय…
‘फॉक्सवॅगन’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप एस. बोपाराय यांच्या मतानुसार, उद्योग चालविणं, धंदा करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. सुरुवातीला गुंतवणुकीसाठी परवानगी सहज मिळते, पण त्यानंतर मात्र व्यवसाय करणं सुलभ नसतं…‘फॉक्सवॅगन’चे भारतात दोन ‘प्लांट्स’ असून ‘स्कोडा’, ‘व्हीडब्ल्यू’, ‘ऑडी’, ‘लांबॉरगिनी’ आणि ‘पॉर्श’ म्हणजे ‘फॉक्सवॅगन’चेच ‘भाऊ’…‘वैयक्तिक कर देणाऱया ग्राहकांवर जास्त बोजा टाकणं योग्य नव्हे. करांचा दर कमी असल्यास खात्रीनं विक्री वाढेल. मी ग्राहकांच्या वतीनं फलंदाजी करतोय’, विश्वनाथन सांगतात…‘टोयोटा’नं ‘किर्लोस्कर’ कुटुंबाशी भागिदारी केलीय आणि त्यात कुटुंबाचा हिस्सा 11 टक्के…विक्रम किर्लोस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं ‘इलेक्ट्रिफाय्ड प्रॉडक्ट्स’ विकसित करण्यासाठी सुमारे 2 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय…
दुसरीकडे, आपली ‘हिरो मोटोकॉर्प’ व अमेरिकेची विश्वविख्यात ‘हार्ले डेव्हिडसन’ यांनी भविष्यात एकमेकांना आलिंगन दिल्यास आश्चर्यचकीत होण्याची गरज नाहीये…‘हार्ले’नं, त्या अतिशय लोकप्रिय, ‘स्टाइलिश’, महागडय़ा दुचाक्यांची निर्मिती करणाऱया कंपनीनं ठरविलंय ते भारतातील ‘स्ट्रटेजी’ला नवीन दिशा देण्याचं. अमेरिकी आस्थापनाला हवाय ‘मजबूत’, ‘स्थानिक’ नि ‘विश्वासार्ह भागीदार’…‘हार्ले डेव्हिडसन’नं आपल्या राष्ट्रात प्रवेश करताना पाहिलं होतं ते भव्य स्वप्न…मोठय़ा वृद्धीचं. कंपनीला भारतीय बाजारपेठेविषयी होता प्रचंड आत्मविश्वास, पण भारतातील ग्राहकांची किमतीसंबंधीची संवेदनशीलता, भावनाप्रधानता, जागरूकता यांच्यामुळं फारशी मजल मारणं शक्य झालेलं नाहीये. शिवाय धक्का दिला तो सुटय़ा भागांचा पुरवठा करणाऱया स्थानिक आस्थापनांनी, ‘सप्लाय चेन’नं देखील…
‘हार्ले डेव्हिडसन’ला आपल्या दिशेनं खेचण्याचा प्रयत्न सुरुवातीला केला तो ‘महिंद्रा’नं. त्याखेरीज अमेरिकी कंपनीनं ‘बजाज ऑटो’शाr सुद्धा चर्चा केली होती…परंतु दोन्ही भारतीय आस्थापनांनी मात्र प्रसिद्ध झालेलं वृत्त पूर्ण चुकीचं असल्याचं म्हटलंय…‘हार्ले’नं भारतातील कारभाराला, कारखान्याला कात्री लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून कंपनीनं ‘हिरो मोटो’च्या दिशेनं पावलं टाकण्यास प्रारंभ केलाय. नवीन ‘सीईओ’ जोचेन झेत्झ यांनी जन्म दिलाय तो ‘दि रिवायर’ डावपेचाला…‘हिरो’चे अध्यक्ष पवन मुंजाल यांनी म्हटलंय, ‘जर त्यांना भागीदारी करायचीय, तर मी योग्य नियमांनुसार सामना खेळायला तयार आहे’…या क्षेत्रातील तज्ञांच्या मते, ‘दोन्ही आस्थापनांमधील कराराचं दर्शन लवकर घडण्याची शक्यता नाहीये. त्यानं वेगळय़ाच दिशेनं प्रवास केल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. कदाचित नवीन भागीदारांना केलेला प्रवेश देखील पाहण्याची संधी मिळेल’…
या वृत्तासंबंधी ‘महिंद्रा’, ‘बजाज ऑटो’, ‘हिरो मोटो’ आणि खुद्द ‘हार्ले डेव्हिडसन’नं मात्र काहीही सांगण्यास नकार दिलाय…‘हिरो ग्रुप’मध्ये क्षमता आहे ती जबरदस्त भागीदार बनण्याची. त्यांनी जपानच्या ‘होंडा’सह सुमारे 26 वर्षं प्रवास केलाय अन् तो फलदायी व यशस्वीही ठरलाय. त्या भागीदारीनं सिद्ध केलंय की, ‘हिरो मोटो’मध्ये ताकद आहे ती इतरांशी व्यवस्थितरीत्या जुळवून घेण्याची. ‘हिरो’च्या साहाय्यानं ‘हार्ले’ला मध्यम आकाराचं इंजिन असलेली ‘मॉडेल्स’ निर्माण करणं, विकसित करणं शक्य होईल. शिवाय त्यांना भारतीय व विदेशी बाजारपेठांना चांगल्या पद्धतीनं धडक देणं सुद्धा जमेल…
यापूर्वी एकदा ‘हिरो’चे सर्वेसर्वा मुंजाल यांनी इच्छा व्यक्त केली होती ‘हार्ले’चे भागीदार बनण्याची. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं, ‘असं लवकर घडल्यास प्रत्येकाच्या दृष्टीनं ते चांगलंच’…विश्लेषकांच्या मतानुसार, ‘बजाज ऑटो’नं ‘ट्रायम्फ’ व ‘केटीएम’सारख्या ‘प्रीमियम’ आस्थापनांबरोबर करार केलेत, तर ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला अजूनपर्यंत ‘टू-व्हीलर’च्या गटातील परिपक्व कंपनी बनणं जमलेलं नाहीये. शिवाय ‘महिंद्रा ग्रुप’ला येऊ घातलेल्या वर्षांत ‘विश्वासार्ह भागीदार’ बनावं लागेल…भारत नि चीन यांच्यातील संघर्षामुळं कदाचित करार लवकर होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केलीय. 2019 सालच्या जून महिन्यात ‘हार्ले डेव्हिडसन’नं चीनच्या ‘क्वियानजियांग मोटरसायकल कंपनी’बरोबर लहान आकाराची नवीन ‘टू व्हीलर’ बनविण्यासाठी करार केला होता. परंतु आता ‘हार्ले’ला वाटतंय की, एखाद्या स्थानिक भागीदाराची निवड करणंच योग्य ठरेल…
अन्य एका घडामोडीनुसार, येऊ घातलेल्या सणांच्या मोसमाला जोरदार धडक देण्यासाठी गेल्या महिन्यांपासून विविध प्रश्नांशी झुंजणारं, दिवसेंदिवस अक्षरशः तळ गाठणारं भारतातील वाहन क्षेत्र सज्ज झालंय असं म्हटल्यास ते पूर्ण चुकीचं किमान सध्या तरी ठरणार नाहीये…यंदाच्या ऑगस्ट महिन्यात ‘पॅसेंजर व्हेइकल’ची (प्रवासी कार्स, एसयूव्ही, यूव्ही, व्हॅन्स) घाऊक विक्री गेल्या वर्षातील ऑगस्ट महिन्याशी तुलना केल्यास 14 टक्क्यांनी वाढलीय अन् पोहोचलीय 2 लाख 15 हजार ‘युनिट्स’वर (गेल्या वर्षी 1 लाख 90 हजार)…सतत नऊ महिने मार खाल्ल्यानंतर ‘प्रवासी वाहनां’च्या खपानं सकारात्मक आकडय़ांची नोंद केलीय…यापूर्वी या ‘सेगमेंट’नं वृद्धी नोंदविली होती ती ऑक्टोबर, 2019 मध्ये. त्यापूर्वीच्या तब्बल 11 महिन्यांनी ‘पॅसेंजर व्हेइकल’ला सातत्यानं दर्शन घडविलं होतं ते घणाघाती फटक्यांचं…
‘टू-व्हीलर’ची विक्रीही ऑगस्ट महिन्यात 3 टक्क्यांनी वाढलीय नि तिनं नेंद केलीय ती 15.6 लाखांची (ऑगस्ट, 2019 मध्ये 15.1 लाख युनिट्स)…‘मोटरसायकल’चा खप 10 टक्क्यांच्या वृद्धीसह 10.3 लाख ‘युनिट्स’वर पोहोचलाय (ऑगस्ट, 2019 मध्ये 9.4 लाख)…‘स्कूटर’च्या विक्रीवर मात्र गेल्या वर्षाशी तुलना केल्यास धक्का सहन करण्याची पाळी आलीय. खप 12 टक्क्यांनी घसरलाय आणि त्यानं नोंद केलीय ती 4.6 लाख ‘युनिट्स’चाr (ऑगस्ट, 2019 मध्ये 5.2 लाख)….‘थ्री-व्हीलर’ला देखील चमक दाखविणं शक्य झालेलं नाहीये. विक्री तब्बल 75 टक्क्यांनी कमी झालीय. तिनं 14 हजार 534 ‘युनिट्स’ची कामगिरी नोंदविलीय (ऑगस्ट, 2019 मध्ये 58 हजार 218)…‘मारूती सुझुकी’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘सियाम’चे अध्यक्ष केनिची अयुकावा यांच्या मतानुसार, ‘टू-व्हीलर’ अन् ‘पॅसेंजर व्हेइकल’नी वाढ नोंदविल्यानं वाहन क्षेत्राचा आत्मविश्वास वाढण्यास मदतच होईल ! – राजू प्रभू