पुरवठा साखळीत सुधारणा होण्याची शक्यता : वाहन क्षेत्रातील अभ्यासकांचे मत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशाच्या वाहन उद्योगाकडून 2022 मध्ये विविध प्रकारच्या अपेक्षा असून त्या पूर्ण करण्यासाठी विविध घटकांमधील सुधारणात्मक स्थितीचा प्रभाव कारणीभूत ठरणार आहे. अनेक कंपन्यांच्या माहितीनुसार नवीन वर्षात वाहनांची विक्री कोरोना महामारीच्या पूर्व पातळीवर पोहोचणार असल्याचे संकेत आहेत.
यामध्ये प्रामुख्याने सेमिकंडक्टर म्हणजे चिपच्या टंचाईतून सावरणे, 2021 च्या अखेरीपर्यंत उत्पादनातील अडथळय़ामुळे प्रलंबीत राहिलेली वाहनांची मागणी आणि स्टीलचे भाव घटत गेल्यामुळे वाहन क्षेत्रातील कंपन्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
वाहन उद्योगांसंदर्भात प्रमुख अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे ‘देशामध्ये प्रवासी वाहनांची मागणी मजबूतपणे वाढत आहे आणि पुरवठा साखळीतला विस्कळीतपणा हळूहळू सुधारत आहे. यासह नवीन वर्षात काही पसंतीच्या इलेक्ट्रिक कार आणि दुचाकींचेही सादरीकरण होणार आहे. त्यामुळे ग्राहकही याबाबतीत उत्सुक आहेत.’ यामुळे देशातील बाजारात तेजीचे वातावरण तयार होणार असल्याचे संकेत व्यक्त होत आहेत.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाचे चेअरमन आरसी भार्गव यांनी 2022 हे वर्ष वाहन उद्योगासाठी 2021 च्या तुलनेत खूप चांगले राहणार असल्याचा दावा केला आहे. वाहन उद्योगाला नव्या वर्षी गती मिळणार आहे.=
स्टील दराचा प्रभाव
स्टीलचे अर्थात पोलादाचे दर 49,300 रुपयांवरून 44,000 रुपये प्रति टन झाले आहेत. आगामी महिन्यात स्टीलची किंमत प्रति टनामागे 3 हजार रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास वाहनांच्या उत्पादनातील अडथळा दूर होणार असल्याची शक्यता असून वाहन कंपन्यांचे मार्जिन वाढत जाणार आहे.
सरकारी योजनांचाही होणार लाभ
- फेम2 योजनेला वर्ष 2024 पर्यंत मिळणार मुदतवाढ
- इलेक्ट्रिक दुचाकीसाठी प्रोत्साहनात होणार वाढ
- वाहनांच्या सुटय़ापार्टसाठी 26 हजार कोटी रुपयाची पीएलआय योजना सुरु
- अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी 18,000 कोटी रुपयाचे सहकार्य मिळणार
- कोरोनाच्या तिसऱया लाटेची सध्यातरी उद्योगाला काळजी नाही