प्रतिनिधी / सातारा
वाढे फाटा येथे पिकअप वाहनाचे चालकास मारहाण करून व चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने ऐवज लुटणारे तीन चोरट्याना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेवून चोरटयांकडून एक दुचाकी, गुन्हयातील हत्यार व रोख रक्कम हस्तगत केली सातारा तालुका डी.बी. पथकाने कारवाई करून अधिक अंकुश पवार (वय २७ वर्षे रा. सैदापूर), सुयश अशोक जाधव (वय १७ वर्षे रा. सैदापूर), आणि एक विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले.
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २१ रोजी रात्रीचे पुणे बंगलोर हायेवरील वाढे गावचे हद्दीमध्ये सर्व्हिस रोडवर एक पिकअप वाहन थांबलेले असताना दुचाकीवरून तीन युवकांनी येऊन गाडी आडवी लावून त्यांनी पिकअप वाहन चालकास हत्यारांचा धाक दाखवून त्यास मारहाण करून त्याच्याकडील तीन हजार रुपये व मोबाईल फोन घेऊन पळून गेले होते. त्यावरून अविनाश किसन शेळके( रा. बिरोबावस्ती लोणंद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सतारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.ही घटना गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल यांनी तात्काळ या गुन्ह्याचा तपास करून संबंधित आरोपीना पकडणेबाबत सूचना केल्या होत्या.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सज्जन हंकारे यांनी डी. बी. पथकाला याबाबत मार्गदर्शन व सुचना करून संशयीत आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. डी. बी. पथकाने माहिती प्राप्त करून एका संशयितास ताब्यात घेतले असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर त्याचेकडे अधिक विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा अन्य दोन साथीदारांसमवेत केल्याचे सांगितल्यावर अन्य दोन संशयिताना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी देखील गुन्हयाची कबुली दिली आहे. सदर गुन्ह्यातील रोख रक्कम व वापरलेले हत्यार व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.