पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
बस चालकाने जोराने ब्रेक दाबल्यामुळे एक प्रवासी तरुण बसमधून बाहेर फेकला गेला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. किल्ला तलावा जवळ घडलेल्या या घटनेनंतर बस चालका विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर त्याने नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरी देखील कर्नाटक परिवहन मंडळाने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली. यामुळे बेळगाव व्यवस्थापय नियंत्रण अधिकाऱयांचे वाहनच जप्त करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी आणि वकील गेले असता तातडीने त्या तरुणाची नुकसान भरपाई देण्यात आली.
राहुल संजय दोशी (वय 23, रा. पाटीलनगर, मुतगा) हा दि. 25 ऑक्टोबर 2018 रोजी बेळगावकडे बस क्रमांक केए 22 एफ 1822 यामधुन येत होता. किल्ला तलावा जवळ येताच बस चालकाने जोराने ब्रेक दाबला. यामुळे राहुल हा रस्त्यावर फेकला गेला. यावेळी त्याच्या खांद्याला, हाताला, डोक्मयाला जखम झाली. चालकाच्या निष्काळजी पणामुळे ही घटना घडली. त्यामुळे त्या चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
या प्रकरणी पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला. त्या ठिकाणी न्यायालयाने सदर तरुणाला 2 लाख 42 हजार 131 रुपये देण्याचे आदेश दिले होते. ती रक्कम सहा टक्के व्याजासह एक महिन्याच्या आत देण्याचा आदेशही 4 मार्चै 2020 राजी दिला होता. मात्र कर्नाटक परिवहन मंडळाने ती देण्यास टाळाटाळ केली. यामुळे न्यायालयाने नियंत्रण अधिकाऱयांचे वाहन जप्त करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या या आदेशानुसार न्यायालयीन कर्मचारी आणि ऍड. एल. व्हाय. पाटील, ऍड. बबन गुरव हे वाहन जप्त करण्यासाठी गेले असता तातडीने त्या ठिकाणी त्या तरुणाला नुकसान भरपाईचा धनादेश दिला गेला. एकूणच नाक दाबताच तोंड उघडल्याचा प्रकार दिसून आला.