प्रतिनिधी /बेळगाव
‘विंग्ज् इंडिया’ या आशियातील सर्वात मोठय़ा एरो शोमध्ये बेळगावचा युवक सहभागी झाला आहे. सध्या तो हैदराबाद येथे वैमानिक प्रशिक्षण घेत असून या एरो शोमध्ये सहभागी झाला आहे. बेळगावचे जुन्या काळातील क्रिकेटपटू व रणजीपटू प्रवीण नरसे यांचा नातू सौरभ ऋषिकेश नरसे हा या एअर शोमध्ये सहभागी झाला आहे. सौरभ तेलंगणा येथील एव्हीएशन अकॅडमीमधून कमर्शियल पायलटचे प्रशिक्षण घेत आहे. पुढील वषी त्याला वैमानिक म्हणून काम करता येणार आहे.
विंग्ज इंडिया या एरो शोमध्ये देशासह परदेशातील नागरिक सहभागी होत असतात. हे प्रदर्शन पाहण्यासाठी जगभरातून 15 ते 20 लाख लोक येथे येतात. 24 ते 27 मार्च दरम्यान हैदराबाद येथे हा एरो शो सध्या सुरू आहे. या प्रदर्शनात विविध विमान कंपन्यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमात एव्हीएशन क्षेत्रातील संशोधक, अधिकारी, पायलट यांनी सहभाग घेतला होता. तेलंगणा सरकार, आंध्रप्रदेश सरकार, मध्यप्रदेश सरकारसह सीएसआयआर, नॅशनल एरोस्पेस लॅबरोटरीज, एअर बस, एम्ब्रॅर, जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर, पवन हाऊस, प्रॅट ऍण्ड व्हाईटनी, रोल्स रॉयल, टर्बो एव्हीएशन यांचा या प्रदर्शनात समावेश होता.