वृत्तसंस्था/ ढाका
विंडीज संघाने यजमान बांगलादेशचा दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ‘व्हाईटवॉश’ साधला. रविवारी येथे झालेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत विंडीजने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव केला. विंडीजने ही कसोटी मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली. सामन्यात 9 बळी टिपणाऱया विंडीजच्या कॉर्नवॉलची ‘सामनावीर’ तर बॉनेरची ‘मालिकावीर’ म्हणून निवड करण्यात आली.
विंडीज संघाकडून बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 231 धावांचे आव्हान देण्यात आले होते पण बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांत आटोपल्याने त्यांना हा सामना 17 धावांनी गमवावा लागला. विंडीजतर्फे फिरकी गोलंदाज कॉर्नवॉलने 105 धावांत 4, ब्रेथवेटने 25 धावांत 3 तर वॉरिकनने 47 धावांत 3 गडी बाद केले. विंडीजच्या या फिरकी त्रिकुटाने बांगलादेशचे सर्व फलंदाज बाद करण्यात यश मिळविले. बांगलादेशच्या दुसऱया डावात सलामीचा फलंदाज तमीम इक्बालने सर्वाधिक म्हणजे 50 धावा तर मेहदी हसन मिराजने 31 धावा जमविल्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने बांगलादेशचा 3 गडय़ांनी पराभव केला होता. या दुसऱया सामन्यात विंडीजच्या कॉर्नवॉलने 9 बळी मिळविले तर पहिल्या कसोटीत 231 धावा झळकविल्याने बॉनेरला ‘मालिकावीराचा बहुमान मिळाला.
संक्षिप्त धावफलक- विंडीज प. डाव-409, बांगलादेश प. डाव-296, विंडीज दु. डाव सर्वबाद 117 (बॉनेर 38, डिसिल्व्हा 20, टी. इस्लाम 4-36, नईम हसन 3-34, अबु जायेद 2-32, मेहदी हसन 1-15), बांगलादेश दु. डाव- 61.3 षटकांत सर्वबाद 213 (तमीम इक्बाल 50, मेहदी हसन मिराज 31, कॉर्नवॉल 4-105, ब्रेथवेट 3-25, वॉरिकन 3-47).