वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट
यजमान विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीतील खेळाचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविला. दिवसभरात एकूण 14 गडी बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने विंडीजला पहिल्या डावात केवळ 97 धावांत उखडले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 4 बाद 128 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या एन्गिडीने 5 तर नॉर्त्जेने 4 बळी मिळविले.
विंडीजच्या भूमीत तब्बल 11 वर्षांनंतर पहिली कसोटी मालिका खेळण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विंडीजला पहिल्या डावात 40.5 षटकात 97 धावात गुंडाळले. त्यानंतर दिवसअखेर दक्षिण आप्रेकेने पहिल्या डावात 4 बाद 128 धावा जमवित 31 धावांची आघाडी मिळविली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज मार्करेमने 60 धावा जमविल्या. दोन सामन्यांच्या या मालिकेत दक्षिण आफ्रिकेतर्फे किगेन पीटरसन आणि कायली व्हेरेनी या दोन नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली. विंडीजच्या पहिल्या डावात एकाही फलंदाजाला 25 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. माजी कर्णधार जेसन होल्डरने 3 चौकारासह 20, कर्णधार क्रेग ब्रेथवेटने 2 चौकारासह 15, शाय होपने 1 चौकारासह 15, कॉर्नवॉलने 2 चौकारासह 13 आणि बॉनरने 1 चौकारासह 10 धावा जमविल्या.
कर्णधार ब्रेथवेट आणि शाय होप या सलामीच्या जोडीने पहिल्या 45 मिनिटांच्या कालावधीत सावध फलंदाजी केली. पण दक्षिण आफ्रिकेने नॉर्त्जेकडे चेंडू सोपविल्यानंतर विंडीजच्या गळतीला सुरुवात झाली. उपहारापूर्वी विंडीजचे चार फलंदाज बाद झाले. त्यापैकी नॉर्त्जेने 3 बळी घेतले होते. उपाहारानंतर विंडीजने पाच फलंदाज केवळ 11 धावात गमविले. 56 या धावसंख्येवर विंडीजचे 3 फलंदाज बाद झाले. कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विंडीजची ही आजवरची निचांकी धावसंख्या आहे. माजी कर्णधार होल्डर शेवटच्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. विंडीजचा पहिला डाव 40.5 षटकात 97 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 19 धावात 5 तर नॉर्त्जेने 35 धावात 4 बळी मिळविले. रबाडाने 24 धावात एक गडी बाद केला. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद करण्याची एन्गिडीची ही दुसरी खेप आहे.
वेगवान गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या डावालाही चांगली सुरुवात झाली नाही. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर विंडीजच्या रॉचने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गारला झेलबाद केले. नवोदित सिल्सने किगेन पीटरसनला होल्डरकरवी झेलबाद केले. त्याने 2 चौकारासह 19 धावा जमविल्या. मार्करम आणि डय़ुसेन यांनी संघाचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 79 धावांची भागीदारी केली. सील्सने दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का देताना मार्करमला डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 110 चेंडूत 7 चौकारासह 60 धावा जमविल्या. सील्सने दक्षिण आफ्रिकेच्या व्हेरेनीला 6 धावावर झेलबाद केले. दिवसअखेर व्हान डर डय़ुसेन 3 चौकारासह 34 तर डिकॉक 4 धावावर खेळत होते. विंडीजतर्फे सील्सने 34 धावात 3 तर रॉचने एक गडी बाद केला. 2010 नंतर विंडीजमध्ये या दोन संघामध्ये पहिलीच कसोटी मालिका खेळविली जात आहे.
संक्षिप्त धावफलक
विंडीज प. डाव 40.5 षटकात सर्वबाद 97 (होल्डर 20, बेथवेट 15, होप 15, बॉनेर 10, कॉर्नवॉल 13, एन्गिडी 5-19, नॉर्त्जे 4-35, रबाडा 1-24), दक्षिण आफ्रिका प. डाव 43 षटकात 4 बाद 128 (मार्करम 60, व्हान डर डय़ुसेन खेळत आहे 34, पीटरसन 19, व्हेरेनी 4, एल्गार 0, डि कॉक खेळत आहे 4, सील्स 3-34, रॉच 1-27).