वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
यजमान विंडीजने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियावर 3-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. सोमवारी या मालिकेतील झालेल्या तिसऱया सामन्यात ‘सामनावीर’ ख्रिस गेलच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने ऑस्ट्रेलियाचा 6 गडय़ांनी पराभव केला. गेलने टी-20 क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पाही पार केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 141 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 14.5 षटकांत 4 बाद 142 धावा जमवित हा सामना 31 चेंडू बाकी ठेवून आरामात जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीच्या वेड आणि कर्णधार फिंच यांनी पहिल्या गडय़ासाठी 5 षटकांत 41 धावांची भर घातली. वेडने 16 चेंडूत 4 चौकारांसह 23 तर फिंचने 31 चेंडूत 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. मिचेल मार्श 9 धावांवर पायचीत झाला. कॅरेने 9 चेंडूत 13, हेन्रिक्सने 29 चेंडूत 2 षटकारांसह 33 तसेच टर्नरने 22 चेंडूत 24 धावा जमविल्या. विंडीजच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे हेडन वॉल्शने 18 धावांत 2 तर मकॉय, ऍलेन आणि ड्वेन ब्रॅव्हो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हेन्रिक्स आणि टर्नर यांनी पाचव्या गडय़ासाठी 59 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्या षटकांतील चौथ्या चेंडूवर सलामीचा फ्लेचर केवळ 4 धावांवर झेलबाद झाला. सिमॉन आणि गेल यांनी दुसऱया गडय़ासाठी 38 धावांची भर घातली. सिमॉन्सने 13 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविल्या. गेल आणि कर्णधार पुरन यांनी तिसऱया गडय़ासाठी 67 धावांची भागिदारी केली. 41 वर्षीय गेलने आक्रमक अर्धशतक झळकविताना 38 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांसह 67 धावा झोडपल्या. पुरनने 27 चेंडूत 1 षटकार, 4 चौकारांसह नाबाद 32 तसेच ब्रॅव्होने 7 आणि रसेलने 1 षटकारांसह नाबाद 7 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 9 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे मेरेडिथने 48 धावांत 3 तर स्टार्कने 15 धावांत 1 गडी बाद केला. विंडीजने या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून ऑस्ट्रेलियावर विजयी आघाडी मिळविली आहे. विंडीजच्या गेलने टी-20 प्रकारात विक्रमी 14000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज होण्याचा बहुमान मिळविला आहे.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 141 (वेड 23, फिंच 30, मार्श 9, कॅरे 13, हेन्रिक्स 33,टर्नर 24, वॉल्श 2-18, मॅकॉय, ऍलेन, ब्रॅव्हो प्रत्येकी 1 बळी), विंडीज 14.5 षटकांत 4 बाद 142 ( गेल 67, पुरण नाबाद 32, फ्लेचर 4, सिमॉन 15, ब्रॅव्हो 7, रस्सेल नाबाद 7, मेरडिथ 3-48, स्टार्क 1-15).