वृत्तसंस्था/ मँचेस्टर
तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी होल्डरच्या नेतृत्वाखाली विंडीजचा क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. या मालिकेतील पहिली कसोटी 8 जुलैपासून सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये पुन्हा वर्णद्वेष निर्माण होत असल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी विंडीजचे क्रिकेटपटू या मालिकेत ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’ असा संदेश असणारा लोगो वापरणार आहेत. या कसोटी मालिकेत खेळताना विंडीज क्रिकेटपटूच्या शर्टाच्या कॉलरवर हा लोगो पाहावयास मिळणार आहे.
जागतिक स्तरावर पुन्हा वर्णद्वेष निर्माण होत असल्याचे अमेरिकेतील घटनेने दिसून आले आहे. काही दिवसापूर्वी अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाली होती. या घटनेचा विंडीज क्रिकेटपटूंकडून निषेध नोंदविला गेला असून जागतिक पातळीवर वर्णद्वेषाला कोणताही थारा जनतेकडून मिळू नये, असे आवाहन या लोगोद्वारे विंडीजचे क्रिकेटपटू करीत आहेत. आयसीसीने विंडीज क्रिकेटपटूंच्या या लोगोला अधिकृत मान्यता दिली आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी इंग्लंडमध्ये फुटबॉलला पुन्हा सुरूवात झाल्यानंतर प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया 20 क्लबच्या फुटबॉलपटूंनी या लोगोचा वापर केला आहे.
कोरोना महामारीनंतर तब्बल तीन महिन्यांचा कालावधी उलटला. आता जुलै महिन्यात विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेत विस्डेन चषक राखण्यासाठी विंडीजचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला असल्याचे कर्णधार होल्डरने म्हटले आहे. जागतिक एकात्मता आणि न्यायासाठी आम्ही नेहमीच झगडत असतो, असा इतिहास विंडीजच्या क्रिकेटपटूंनी घडविला आहे, असेही विंडीजच्या कर्णधाराने सांगितले.