ओल्ड ट्रफोर्डवर इंग्लंडविरुद्ध दुसरी कसोटी आजपासून
मँचेस्टर / वृत्तसंस्था
येथील ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्याच्या माध्यमातून पाहुण्या विंडीज संघाकडे तब्बल 32 वर्षांनंतर इंग्लिश भूमीत कसोटी मालिकाविजय संपादन करण्याची नामी संधी असेल. 3 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील साऊदम्प्टन येथील पहिल्या कसोटीत विंडीजने रोमांचक विजय संपादन करत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यावर येथे कळस चढवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता पहिल्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल.
एजिस बॉल येथील पहिल्या कसोटीत स्वतः आघाडीवर लढणाऱया विंडीज कर्णधार जेसॉन होल्डरने इंग्लंडविरुद्ध मागील 6 कसोटीत 4 विजय मिळवून दिले असून येथे तो 1988 नंतर मालिका जिंकणारा पहिलाच विंडीज कर्णधार ठरु शकतो. 32 वर्षांपूर्वी व्हीव रिचर्ड्स यांनी असा पराक्रम गाजवला होता.
वास्तविक, कागदावर इंग्लंडचा संघ विंडीजपेक्षा सरस आहे. पण, आश्चर्य म्हणजे 2015 नंतर झालेल्या 10 सामन्यात विंडीजने याच इंग्लिश संघाला 5 वेळा धूळ चारली आहे. मागील 10 मालिकांमध्ये इंग्लंडने पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारण्याची ही 8 वी वेळ आहे. पण, यातील बहुतांशी वेळा इंग्लंडने नंतर मुसंडी मारण्यात यश प्राप्त केले. त्याची पुनरावृत्ती ते येथे करणार का, हे या आठवडय़ात स्पष्ट होईल.
तिसऱया स्थानी कोण?
यजमान इंग्लंडला या लढतीत मैदानावर उतरण्यापूर्वी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तिसऱया स्थानी क्रॉली खेळणार की डेन्ली, हे महत्त्वाचे असेल. त्या शिवाय गोलंदाजीत कोणते बदल करणार, याचीही उत्सुकता असेल. पुढील 7 आठवडय़ात इंग्लंडचा संघ 6 कसोटी सामने खेळणार असून त्यामुळे गोलंदाजांना रोटेट करण्यावर यजमान संघाचा भर असू शकतो. यापूर्वी, साऊदम्प्टनमधील पहिल्या कसोटीत इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉडला खेळवले नाही. पण, त्यांना याचा मोठा फटका सोसावा लागला. त्यामुळे, त्याला येथे पाचारण केले गेले तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.
संभाव्य संघ
इंग्लंड : जो रुट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबली, झॅक क्रॉली, बेन स्टोक्स, ऑलि पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन.
विंडीज : जेसॉन होल्डर (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, क्रेग ब्रेथवेट, शाय होप, शमरह ब्रूक्स, रोस्टन चेस, जर्मेन ब्लॅकवूड, शेन डॉरिच, रहकीम कॉर्नवल, केमर रोश, शेनॉन गॅब्रिएल.
सामन्याची भारतीय प्रमाणवेळ : दुपारी 3.30 पासून.
बॉक्स
तिसरा यशस्वी कर्णधार होण्यासाठी होल्डरला एका विजयाची गरज
कर्णधार जेसॉन होल्डर आणखी एका विक्रमाच्या उंबरठय़ावर असून येथे विजय संपादन करुन दिल्यास तो तिसरा सर्वात यशस्वी विंडीज कर्णधार ठरु शकतो. यापूर्वी साऊदम्प्टन येथे 11 वा कसोटी विजय मिळवून दिला, त्यावेळी होल्डरने रिची रिचर्डसनशी बरोबरी केली. विंडीजला सर्वाधिक कसोटी विजय मिळवून देणाऱया कर्णधारांच्या यादीत तूर्तास क्लाईव्ह लॉईड (36 विजय) व व्हीव रिचर्ड्स (24 विजय) पहिल्या दोन स्थानावर आहेत. होल्डरने आतापर्यंत विंडीजतर्फे 33 कसोटी सामन्यात नेतृत्व साकारले असून त्यात 11 विजय मिळवले आहेत.
बॉक्स
नियमित कर्णधार जो रुट परतत असल्याने इंग्लंडला बळ
यापूर्वी, पहिल्या कसोटी सामन्यात खेळू न शकलेला नियमित कर्णधार जो रुट येथे संघात दाखल झाला असून यामुळे इंग्लंडच्या आशाअपेक्षा बऱयाच उंचावलेल्या असतील. ओल्ड ट्रफोर्डवरील अनुकूल प्रदर्शन ही देखील यजमान संघाची जमेची बाजू असेल. मागील दोन दशकात इंग्लंडने या मैदानावर 14 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यांनी 9 विजय व 3 अनिर्णीत अशी कामगिरी केली. त्यांना फक्त 2 पराभव स्वीकारावे लागले आहेत.