मुंबईत सरावाला प्रारंभ, बेंगळुरात तंदुरुस्ती चाचणी होणार, हार्दिक पंडय़ाच्या उपलब्धतेमुळे भुवनेश्वर-अश्विनवर टांगती तलवार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातील भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विंडीजविरुद्ध आगामी मालिकेत नेतृत्व करण्यासाठी ‘सज्ज’ आहे, असे सूत्रांनी मंगळवारी नमूद केले. भारतीय संघ मायभूमीत मर्यादित षटकांचे 6 सामने खेळणार असून अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारी रोजी या मालिकेला सुरुवात होत आहे.
‘रोहित शर्माने मुंबईत यापूर्वीच सरावाला सुरुवात केली असून तो तंदुरुस्ती चाचणीसाठी बेंगळूरला येईल आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून त्याच्या तंदुरुस्तीवर शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे, असे बीसीसीआयमधील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
या मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी पुढील आठवडय़ात बैठक होणे अपेक्षित आहे. हार्दिक पंडय़ाही उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याने भुवनेश्वर कुमार व रविचंद्रन अश्विनसारख्या वरिष्ठ खेळाडूंबद्दल काय निर्णय होणार, याची उत्सुकता असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत भारताला व्हॉईटवॉशचा सामना करावा लागला, त्यात अश्विन व भुवनेश्वर हे दोन्ही खेळाडू निष्प्रभ ठरले होते. त्या मालिकेत रोहित शर्मा धोंडशिरेच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो तंदुरुस्त होऊन परतत असल्याने संघाला बळकटी लाभू शकते.
कसोटीतील नेतृत्वही रोहितकडेच
कसोटी नेतृत्वासाठी बीसीसीआय अन्य पर्यायाच्या विचाराधीन असले तरी सध्याच्या घडीला ही जबाबदारी रोहित शर्माकडेच सोपवले जाईल, असे संकेत आहेत. केएल राहुल नेतृत्वाच्या पहिल्या टप्प्यात अपेक्षापूर्ती करु शकला नाही. त्यामुळे, रोहितच्या छत्रछायेखाली त्याने आणखी धडे गिरवावेत, अशी अपेक्षा असेल. याशिवाय, केएल राहुल आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाचे नेतृत्व भूषवणार असल्याने त्याच्या तेथील कामगिरीवर देखील मंडळाचे लक्ष असेल, असे संकेत आहेत.
हार्दिक पंडय़ाचा सराव सुरु
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव सुरु केला असला तरी तो पूर्ण क्षमतेने गोलंदाजी करु शकणार का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, वेंकटेश अय्यर सहाव्या स्थानी खेळण्यासाठी प्रगल्भ नसल्याने आणि द्रविड यांनी पंडय़ाची उणीव जाणवल्याची यापूर्वी कबुली दिली असल्याने विंडीजविरुद्ध पंडय़ाचे पुनरागमन होण्याची शक्यता अधिक आहे.
मंडळातील सूत्राने मात्र याबाबत सावध पवित्रा घेतला. टी-20 वर्ल्डकपनंतर हार्दिकला तंदुरुस्त असतानाही वगळले गेले होते. निवडकर्त्यांनी त्याला या माध्यमातून इशारा दिला. मात्र, तो एक अव्वल खेळाडू आहे आणि त्याला फार काळ संघाबाहेर ठेवता येणार नाही. विंडीजविरुद्ध शक्य झाले नाही तर लंकेविरुद्ध मालिकेत तरी तो संघात निश्चितपणाने परतेल, असा दावा या सूत्राने केला.
बुमराहला विश्रांतीची शक्यता
सध्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत गांभीर्याने विचार होत असून या पार्श्वभूमीवर जसप्रित बुमराहला विंडीजविरुद्ध 6 सामन्यांमधून विश्रांती देण्याची शक्यता चर्चेत आहे. बुमराहचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी व 3 वनडे अशा सर्व 6 लढतीत समावेश होता. यात त्याने सर्वाधिक षटके (कसोटीत 104.5 व वनडेत 30 षटके) गोलंदाजी केली. भुवनेश्वर खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला डच्चू मिळाल्यास आश्चर्याचे कारण नसेल. मात्र अश्विनला आणखी एक संधी मिळू शकते. अवेश खान व हर्षल पटेलसारखे काही युवा खेळाडू टी-20 संघात स्थान मिळवू शकतील, असे चित्र आहे.
भारत-विंडीज मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
6 फेब्रुवारी / पहिली वनडे / अहमदाबाद
9 फेब्रुवारी / दुसरी वनडे / अहमदाबाद
11 फेब्रुवारी / तिसरी वनडे / अहमदाबाद
16 फेब्रुवारी / पहिली टी-20 / कोलकाता
18 फेब्रुवारी / दुसरी टी-20 / कोलकाता
20 फेब्रुवारी / तिसरी टी-20 / कोलकाता