वृत्तसंस्था /ब्रिजटाऊन (बार्बाडोस)
यजमान विंडीज आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी क्रिकेट कसोटी रविवारी येथे खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिली. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिल्या दोन कसोटी अनिर्णित राहिल्या असून आता तिसरी आणि शेवटची कसोटी ग्रेनेडा येथे येत्या गुरूवारपासून सुरू होणार आहे.
रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने उपाहारापर्यंत आपला दुसरा डाव घोषित केला नाही. इंग्लंडने दुसऱया डावात 6 बाद 185 धावा जमवित डावाची घोषणा केली. त्यामुळे विंडीजला 65 षटकांत विजयासाठी 282 धावांचे आव्हान इंग्लंडने दिले. विंडीजचा कर्णधार ब्रेथवेटने पहिल्या डावात जवळपास 12 तास खेळपट्टीवर राहून 160 धावांची खेळी केली होती. खेळाच्या दुसऱया सत्रामध्ये खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल ठरल्याने विंडीजची दुसऱया डावात स्थिती 13 षटकाअखेर 3 बाद 39 झाल्याने इंग्लंडचा संघ विजयासाठी आशावादी झाला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज लीचने कँपबेलला 10 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर इंग्लंडचा नवा वेगवान गोलंदाज सकीब मेहमूदने विंडीजच्या ब्रुक्स आणि बॉनेर यांना कर्णधार रूटकरवी अनुक्रमे 4 आणि 3 धावांवर झेलबाद केले. कर्णधार ब्रेथवेट आणि ब्लॅकवूड यांनी चौथ्या गडय़ासाठी 50 धावांची भागिदारी केली. लीचने ब्लॅकवूडला झेलबाद केले. त्याने दोन चौकारांसह 27 धावा जमविल्या. लीचने विंडीजला आणखी एक धक्का देताना होल्डरला खाते उघडण्यापूर्वी लॉरेन्सकरवी झेलबाद केले. विंडीजची स्थिती यावेळी 44.3 षटकांत 5 बाद 93 अशी होती.
शेवटच्या दिवशीच्या खेळातील जवळपास 20 षटके बाकी होती पण ब्रेथवेट आणि डिसिल्वा यांनी चिवट फलंदाजी करत ही कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळविले. 65 षटकाअखेर विंडीजने दुसऱया डावात 5 बाद 135 धावा जमविल्या. ब्रेथवेट 184 चेंडूत 4 चौकारांसह 56 तर डिसिल्वा 63 चेंडूत 6 चौकारांसह 30 धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडतर्फे लीचने 36 धावांत 3 तर सकीब मेहमूदने 21 धावांत 2 गडी बाद केले. लीचने या कसोटीत 94.5 षटकांची गोलंदाजी केली असून गेल्या 60 वर्षांच्या इंग्लंडच्या कसोटी कारकीर्दीत तो सर्वाधिक षटके टाकणारा इंग्लंडचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्याने या सामन्यात एकूण 6 बळी मिळविले.
या कसोटीत इंग्लंडने पहिला डाव 9 बाद 507 धावांवर घोषित केल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 411 धावा जमविल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 96 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर इंग्लंडने बिनबाद 40 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांनी आपला दुसरा डाव 39.5 षटकांत 6 बाद 185 धावांवर घोषित केला. इंग्लंडच्या डावात क्रॉलेने 4 चौकारांसह 40, लीसने दोन चौकारांसह 24, रूटने एक चौकारांसह 9, लॉरेन्सने 2 षटकार आणि एक चौकारांसह 41, स्टोक्सने एक षटकार आणि एक चौकारांसह 19, बेअरस्टोने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 29, फोक्सने नाबाद 11 तर वोक्सने नाबाद 9 धावा जमविल्या. विंडीजतर्फे पेरमॉल आणि सिलेस यांनी प्रत्येकी 2 तर जोसेफ आणि रॉच यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव-9 बाद 507 धावा डाव घोषित, इंग्लंड प. डाव- सर्वबाद 411, इंग्लंड दु. डाव- 39.5 षटकांत 6 बाद 185 डाव घोषित (क्रॉले 40, लीस 24, रूट 9, लॉरेन्स 41, स्टोक्स 19, बेअरस्टो 29, फोक्स नाबाद 11, वोक्स नाबाद 9, पेरमॉल 2-29, सिलेस 2-34, रॉच 1-31, जोसेफ 1-45), विंडीज दु. डाव 65 षटकांत 5 बाद 135 (ब्रेथवेट नाबाद 56, कँपबेल 10, ब्रुक्स 4, बॉनेर 3, ब्लॅकवूड 27, होल्डर 0, डिसिल्वा नाबाद 3 लीच 3-36, सकीब मेहमूद 2-21).