वृत्तसंस्था/ सेंट लुसिया
विंडीज व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटीला आज गुरुवारपासून सुरुवात होत असून विंडीजने शाय होपला पुनरागमनाची संधी दिली आहे तर युवा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
34 कसोटीत विंडीजचे प्रतिनिधित्व केलेल्या शाय होपला मागील वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खराब प्रदर्शन झाल्यानंतर वगळण्यात आले होते. त्याच्याप्रमाणे कीरन पॉवेलचेही या संघात पुनरागमन झाले आहे. या डावखुऱया सलामीवीराने डिसेंबर 2018 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. 19 वर्षीय जेडेन सील्स हा त्रिनिदादचा आश्वासक वेगवान गोलंदाज असून तो 2020 मध्ये झालेल्या यू-19 विश्वचषक स्पर्धेत विंडीज संघातून खेळला होता. गेल्या डिसेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विंडीज अ संघातून त्याने केवळ एक प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. वरिष्ठ स्तरावर त्याने एकूण 10 व्यावसायिक सामन्यांत भाग घेतला आहे. या उत्साही युवा खेळाडूच्या समावेशामुळे विंडीजच्या गोलंदाजीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे, असे निवड समिती प्रमुख रॉजर हार्पर म्हणाले.
पॉवेलच्या फलंदाजीची क्षमता सगळय़ांनाच माहित असून त्याच्या समावेशामुळे संघाच्या फलंदाजीचा दर्जा व खोली वाढणार आहे. शाय होपने यापूर्वी कसोटी सामन्यात भरीव योगदान दिलेले आहे. लंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याने चमक दाखविली असल्याने त्याची संघात निवड करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. या संघातून अनुभवी फलंदाज डॅरेन ब्रॅव्होला वगळण्यात आले आहे तर स्ट्राईक बॉलर शॅनन गॅब्रिएल जखमी असल्याने त्याचा समावेश करण्यात आला नाही. विंडीज-द.आफ्रिका दुसरी कसोटी सेंट लुसिया येथेच 18 जूनपासून सुरू होणार आहे.
विंडीज कसोटी संघ ः क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), ब्लॅकवूड, बॉनर, रॉस्टन चेस, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ दा सिल्वा, जेसॉन होल्डर, शाय होप, अल्झारी जोसेफ, काईल मेयर्स, कीरन पॉवेल, केमर रॉश, जेडेन सील्स.