वृत्तसंसा/ बार्बाडोस
विंडीज क्रिकेट मंडळाला सध्या मोठय़ा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांनी आपल्या खेळाडूंना तसेच इतर कर्मचाऱयांच्या वेतनामध्ये आगामी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एकूण वेतनापैकी 50 टक्के रक्कम तूर्ताला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना महामारी संकटामुळे क्रिकेट विंडीजची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली असून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोव्हिड-19 संकटामुळे संपूर्ण जगातील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्रिकेट पूर्णपणे थांबविण्यात आले आहे. त्यामुळे विविध देशांच्या क्रिकेट मंडळांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे विंडीज क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिकी स्कीरेट यांनी सांगितले.
या समस्येमुळे मंडळाच्या कर्मचारी वर्गाचा तसेच खेळाडू, पंच, प्रशिक्षक यांच्या वेतनातील 50 टक्के रक्कम सध्या दिली जाणार असून उर्वरित निम्मी रक्कम उशिरा दिली जाणार असल्याचा खुलासा विंडीज क्रिकेट मंडळाने केला आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही तरतूद करण्यात आली आहे. येत्या जुलैमध्ये विंडीजचा क्रिकेट संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱयाला विंडीज क्रिकेट मंडळाकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.