वृत्तसंस्था/ बार्बाडोस
यजमान विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या गुरूवारपासून सेंट लुसिया येथे प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पाहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्यासाठी विंडीजच्या वेगवान गोलंदाजीमध्ये अधिक सुधारणा घडवून आणण्यावर प्रशिक्षक सिमॉन्सनी भर दिला आहे.
उभय संघातील होणाऱया पहिल्या कसोटीत सेंट लुसियाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अधिक उपयुक्त ठरण्याची शक्यता सिमॉन्सनी वर्तविली आहे. विंडीजच्या वेगवान गोलंदाजीमध्ये सुधारणा होणे जरूरीचे आहे. ही कसोटी मालिका जिंकण्यासाठी विंडीजच्या गोलंदाजांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील, असे सिमॉन्सनी म्हटले आहे. विंडीज संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 28 पैकी 3 कसोटी सामने जिंकले आहेत. विंडीजने 2007 साली दक्षिण आफ्रिकेवर कसोटीत आपला शेवटचा विजय मिळविला होता. 2015 नंतर पहिल्यांदाच विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका होत आहे.