वृत्तसंस्था / सेंट जॉर्ज (ग्रेनेडा
तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर यजमान विंडीज संघाची आगेकूच मालिका विजयाकडे आहे. डिसिल्वाच्या नाबाद शतकामुळे विंडीजने इंग्लंडवर पहिल्या डावात 93 धावांची आघाडी मिळविली. दरम्यान विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडची दुसऱया डावात स्थिती 8 बाद 103 अशी केविलवाणी झाली. विंडीजच्या मेयर्सने 9 धावांत 5 गडी बाद केले.
तीन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्याने या शेवटच्या सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या निर्णायक कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव 204 धावांत आटोपल्यानंतर विंडीजने 8 बाद 232 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा पहिला डाव 297 धावांत आटोपला. जोशुआ डिसिल्वाने 257 चेंडूत दहा चौकारांसह नाबाद 100 धावा झळकविताना रॉच आणि सिलेस या शेवटच्या फलंदाजांची त्याला साथ मिळाली. डिसिल्वा आणि रॉचने नवव्या गडय़ासाठी 68 धावांची भागिदारी केली. रॉचने 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. तो बाद झाल्यानंतर डिसिल्वाने सिलेससमवेत शेवटच्या गडय़ासाठी 52 धावांची भर घातली. सिलेसने एक षटकार आणि एक चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजचा पहिला डाव 116.3 षटकांत 297 धावांवर समाप्त झाला. इंग्लंडतर्फे वोक्सने 3, ओव्हरटन, शकीब मेहमूद आणि बेन स्टोक्स आणि प्रत्येकी 2 तर रूटने एक गडी बाद केला.
93 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला दुसऱया डावात चांगली कामगिरी करता आली नाही. विंडीजच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. विंडीजचा मेयर्स इंग्लंडचा कर्दनकाळ ठरला. इंग्लंडच्या दुसऱया डावात केवळ दोन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. सलामीच्या लिसने दोन चौकारांसह 31 तर बेअरस्टोने 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. विंडीजच्या मेयर्सने 9 धावांत 5 तर सिलेस आणि जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडचा संघ केवळ 10 धावांनी आघाडीवर आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी विंडीजचा संघ विजय मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड प. डाव 204, विंडीज प.डाव 116.3 षटकांत सर्वबाद 297 (डिसिल्वा नाबाद 100, जोसेफ 28, रॉच 25, कँपबेल 35, ब्रेथवेट 17, ब्लॅकवूड 18, मेयर्स 28, सिलेस 13, वोक्स 3-59, ओव्हरटन 2-81, शकीब मेहमूद 2-45, स्टोक्स 2-48, रूट 1-1), इंग्लंड दु. डाव 53 षटकांत 8 बाद 103 ( लीस 31, बेअरस्टो 22, मेयर्स 5-9, सिलेस 1-24, जोसेफ 1-34).