पुढील आठवडय़ात इंग्लंडविरुद्ध होणार पहिली कसोटी
वृत्तसंस्था/ लंडन
पुढील आठवडय़ात होणाऱया इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियलची खेळण्याची शक्यता वाढली असून गुरुवारी त्याचा विंडीज संघात समावेश करण्यात आला आहे.
सुरुवातीला गॅब्रियलचा राखीव खेळाडूंत समावेश करण्यात आला होता. पण आता फिटनेस सिद्ध करून दाखविल्यावर त्याला 15 प्रमुख खेळाडूंच्या संघात स्थान देण्यात आले आहे. ओल्ड ट्रफर्ड येथे या संघाचा सराव सुरू असून अंतर्गत संघात झालेल्या दोन सराव सामन्यात समाधानकारक प्रदर्शन करीत घोटय़ाला झालेल्या दुखापतीतून पूर्ण सावरलो असल्याचे त्याने दाखवून दिले. ‘गॅब्रियलचा संघात समावेश करू शकलो, याचा आम्हाला आनंद वाटतो,’ असे विंडीजचे निवड सदस्य रॉजर हार्पर म्हणाले. ‘आपण फिट असून कसोटीत खेळण्यास सज्ज असल्याचेच त्याने दाखवून दिले आहे. त्याच्या अनुभवाचा आणि क्षमतेचा संघाला चांगला फायदा होऊ शकतो,’ असेही ते म्हणाले.
दोन सराव सामन्यात गॅब्रियलने 15 धावांच्या सरासरीने 8 बळी मिळविले. 32 वर्षीय गॅब्रियल अनुभवी कसोटीपटू असून त्याने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर पदार्पण केल्यानंतर 45 कसोटी खेळल्या आहेत. त्यात त्याने 132 बळी मिळविले आहेत. गेल्या वर्षी विंडीजने मायभूमीत इंग्लंडविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली, त्यात गॅब्रियलचे मोलाचे योगदान होते. गुरुवारी विंडीजचा शेवटचा सराव सामना झाला, त्यावेळी प्रशिक्षक फिल सिमॉन्सही क्वारंटाईननंतर संघात पुन्हा दाखल झाले होते. या सराव सामन्यात गॅब्रियलने 42 धावांत 4 बळी मिळविले. ब्रेथवेट इलेव्हन संघाने 7 बाद 112 वरून डाव पुढे सुरू केला आणि 178 धावांत त्यांचा डाव आटोपला. खेळ सुरू होण्याआधी विंडीज संघाने महान फलंदाज एव्हर्टन वीक्स यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून व नंतर दंडावर काळय़ा फिती लावून त्यांना आदरांजली वाहिली.