वृत्तसंस्था / लंडन
2022 पासून होणाऱया विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या रूपरेषेमध्ये बदल करण्याचा निर्णय स्पर्धां आयोजकांनी तसेच अखिल इंग्लंड लॉन टेनिस क्लबने घेतला आहे. आता 2022 पासून विंबल्डन स्पर्धेचा कालावधी 14 दिवसांचा राहणार असून रविवारी सुटीच्या दिवशीही सामने खेळविले जाणार आहेत.
आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रामध्ये विंबल्डन ग्रासकोर्ट ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा ही प्रतिष्ठेची समजली जाते. आतापर्यंत ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवडय़ात येणारा रविवार हा सुटीचा दिवस असल्याने सामन्यांना विश्रांती दिली जात असे पण या रूपरेषेमध्ये आता बदल करण्यात आला असून रविवारी सुटीच्या दिवशी सामने खेळविले जाणार असल्याने ही स्पर्धा 14 दिवसांची राहील, अशी माहिती अखिल इंग्लंड लॉन टेनिस क्लबचे चेअरमन इयान हेविट यांनी दिली आहे. या स्पर्धेसाठी ग्रासकोर्टमध्ये खूपच तांत्रिक सुधारणा करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये प्रत्येक वर्षी या स्पर्धेसाठी विविध देशांचे टेनिसपटू सहभागी होत असतात त्यामुळे या परिसरातील रेस्टॉरंट तसेच बार यांचा व्यापार चांगला होत असतो. काही देशांचे खेळाडू लंडनमध्ये या स्पर्धेबरोबरच खासगीरित्या आनंद लुटण्यासाठी काही निवासस्थाने भाडय़ाने घेत असतात. कोरोना महामारीमुळे 2020 सालातील विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा रद्द करण्यात आली होती.