आज युटय़ूबवर होणार प्रसारण
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
क्रेडाई सिंधुदुर्ग या सिंधुदुर्गातील संस्थेने साई जळवी फिल्मच्या माध्यमातून बदलत्या सिंधुदुर्गातील विकासात्मक घडामोडींवर आधारित एका उत्कृष्ट लघुपटाची निर्मिती केली आहे. सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध मराठी विनोदी अभिनेते अभिजित चव्हाण यांचे सुंदर निवेदन या लघुपटाला लाभले आहे. 16 ऑगस्ट रोजी साई जळवी युटय़ूब चॅनेलवरून त्याचे प्रसारण होणार आहे.
गेले चार महिने कोरोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण जग थांबून राहिलंय. लॉकडाऊनमुळे प्रत्येकालाच आपल्या गावची ओढ लागली आहे. अनेकजण तर हय़ा कठीण परिस्थितीमध्ये आपल्या गावी परतले आहेत आणि जी लोकं नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आपली गावची घरं, जमिनी विकून मुंबईत स्थायिक झाले आहेत, त्यांना सुद्धा आता गावात आपल्या हक्काच्या घराची उणीव भासू लागली आहे. याच विषयाला अनुसरून क्रेडाई सिंधुदुर्गच्या माध्यमातून या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्गाचा बदलता चेहरा पाहायला मिळणार आहे.
या लघु चित्रपटाची पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन साईनाथ जळवी यांनी केले आहे. मूळ कथा समीर साखळकर यांनी लिहिली आहे. छायाचित्रण साईनाथ मठकर, मनोज मठकर, संकलन दिनार पावसकर, सब टायटल अमर प्रभू, आर्या भिसे, ड्रोन चित्रण साईनाथ मठकर, रवी वारंग, संगीत सिने मालिका सृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ओंकार टिकले आणि साऊंड डिझाईनर म्हणून सुशील वालावलकर यांनी संगीत दिलं आहे. त्याचबरोबर मेकअप नागेश म्हापणकर, आर्या बागवे, वाहतूक व्यवस्था संदेश चिकोडीकर, मनोहर धुरी आणि या फिल्मचे प्रॉडक्शन साई जळवी फिल्म्सच्यावतीने संजय बागवे आणि साईनाथ साळगावकर यांनी सांभाळलं आहे.
या फिल्मसाठी पेडाई सिंधुदुर्गचे अभिजित जैतापकर, समीर साखळकर, उद्योजक केशव भिसे, फोटोग्राफर मयुर वाईरकर आणि महेश पेडणेकर यांचेही सहकार्य लाभले आहे. हा लघुपट 16 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पाहता येणार आहे, अशी माहिती जळवी यांनी दिली.