वृत्तसंस्था/ कानपूर
उत्तरप्रदेशच्या कानपूर येथील बिकरु गावात गँगस्टर विकास दुबे आणि पोलिसांमधील चकमकीला 4 दिवस उलटले आहेत. फरार विकाससंबंधी अद्याप कुठलाच सुगावा हाती लागलेला नाही. उत्तरप्रदेश एसटीएफ आणि पोलिसांच्या 40 पथकांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या पथकाने मंगळवारी त्याच्या घराच्या ढिगाऱयात तपासणी केली आहे. या तपासणीत अनेक बनावट ओळखपत्रे आणि गावठी बॉम्ब सापडले आहेत. बनावट ओळखपत्रांद्वारे गँगस्टर विकास जमिनींची खरेदीविक्री करत होता. स्वतःच्या टोळीच्या गुंडांशी संपर्क साधण्यासाठी त्याने घरातच बिनतारी नियंत्रण कक्ष निर्माण केला होता.
गुंडाने स्वतःच्या टोळीचे सदस्य, नातलग आणि कामगारांच्या नावावर मालमत्तांची खरेदी केली होती. पोलिसांच्या चौकशीच्या कक्षेत आता बँक आणि वित्तीय कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. गँगस्टर विकास दुबेच्या घरानजीक मोठय़ा संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तेथे जाऊ पाहणाऱया प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. तर गावातील 20 पुरुष फरार असून घरांमध्ये केवळ महिलाच आढळून आल्या आहेत.