वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमधील लंडन उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय पालटवत ज्युलियन असांजेला अमेरिकेत प्रत्यार्पित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. कनिष्ठ न्यायालयाने विकीलीक्सच्या संस्थापकाच्या मानसिक आरोग्याचा दाखला देत प्रत्यार्पणाची अमेरिकेची मागणी फेटाळली होती. 50 वर्षीय ऑस्ट्रेलियन नागरिक असांजे हजारो गोपनीय सैन्य तसेच राजनयिक दस्तऐवजांचे प्रकाशन केल्याप्रकरणी आरोपी आहे.
चालू वर्षाच्या प्रारंभी कनिष्ठ न्यायालयाने विकीलीक्सकडून एक दशकापूर्वी गुप्त सैन्यदस्तऐवजांचे प्रकाशन केल्याप्रकरणी हेरगिरीच्या आरोपांना तेंड देणाऱया असांज यांचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याची मागणी फेटाळली होती. असांजे यांना प्रत्यार्पित करण्यात आल्यास स्वतःच्या कमकुवत मानसिक स्थितीमुळे ते आत्महत्या करण्याचा धोका असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले होते.
तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अमेरिकेच्या अधिकाऱयांनी प्रत्यार्पणाचा खटला जिंकला आहे. असांजेशी संबंधित आत्महत्येची जोखीम कमी करण्यासाठी योग्य पावले उलचू असे या अधिकाऱयांनी न्यायालयाला सांगितले आहे.
175 वर्षांची शिक्षा शक्य
असांजेवर अमेरिकेत हेरगिरीचे 17 आरोप आणि संगणकाचा (कॉम्प्युटर) गैरवापर संबंधी एक आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांमध्ये दोषी ठरल्यास त्याला कमाल 175 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्याचा विचार असल्याचे असांजे यांची वाग्दत्त वधू स्टेला मॉरिस यांनी सांगितले आहे.
असांजेंच्या जीवाला धोका
ज्युलियन यांचे जीवन पुन्हा एकदा गंभीर धोक्यात आहे. सरकारांना असुविधाजनक वाटणारी सामग्री प्रकाशित करण्याचा अधिकार पत्रकारांना असल्याचे विधान विकीलीक्सचे मुख्य संपादक क्रिस्टिन हाफंसन यांनी केले आहे. पोलिसांकडून इक्वेडोरच्या दूतावासातून बाहेर आणले गेल्यावर 2019 पासून असांजे बेलमार्श तुरुंगात आहे. जामीन अटींचा भंग केल्याप्रकरणी असांजेला अटक करण्यात आली होती.