मोजकीच जनावरे दाखल, खरेदी-विक्री मंदावली
बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासनाने शनिवार, रविवार विकेंड कर्फ्यू जारी केला आहे. त्यामुळे सर्वच व्यवहारांवर परिणाम झाला आहे. याला शनिवारचा जनावरांचा बाजार देखील अपवाद नाही. शनिवारच्या जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या नगण्य होती. याबरोबरच खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने उलाढालीवर परिणाम झाला.
एपीएमसी मार्केटच्या आवारात दर शनिवारी जनावरांचा बाजार भरतो. याठिकाणी विविध भागातून मोठय़ा प्रमाणात गायी-म्हशी व बैल खरेदी-विक्रीसाठी आणले जातात. मात्र शनिवारी विपेंड कर्फ्यूच्या धास्तीने खरेदीदारांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिवारच्या जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. खरेदी-विक्रीची उलाढाल मंदाविली.
एरव्ही जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीतून लाखों रूपयांची उलाढाल होत असते. मात्र शनिवारच्या बाजारात विक्रीसाठी काही जनावरे दाखल झाली होती. मात्र खरेदीदार कमी आल्यामुळे खरेदी-विक्री म्हणावी तशी झाली नाही. त्यामुळे विक्रीसाठी आणलेली काही जनावरे परत घेऊन जाऊ लागली. कोरोनामुळे मागील दोन वर्षात जनावरांच्या बाजारावर मोठा परिणाम झाला होता. मध्यंतरी कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जनावरांचा बाजार सुरळीत सुरू झाला होता. दरम्यान खरेदी-विक्रीचे व्यवहारही मोठय़ा प्रमाणात सुरू होते. मात्र पुन्हा कोरोनाचे संकट ओढविल्याने प्रशासनाने विकेंड कर्फ्यूबरोबर कडक निर्बंध घातले आहे. त्यामुळे इतर व्यवहारांबरोबर जनावरांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.
शनिवारच्या जनावरांच्या आठवडी बाजारात मुरा, पंढरपुरी, जाफराबादी, यासह गायींमध्ये जर्शी, गीर, याबरोबर बैलांच्या जातीमध्ये खिलारी, संकेश्वरी इतर जातींच्या जनावरांची खरेदी-विक्री होते. मात्र गेल्या आठवडय़ाभरापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जनावरांच्या बाजारावर परिणाम झला. याबरोबच पुढील आठवडय़ाचा बाजार देखील भरणार की? नाही अशी चिंता शेतकरी, दलाली व व्यापाऱयांना लागली आहे.