सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत व्यवहारांना अनुमती : लसीकरणासाठी जाणाऱयांना सवलत
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव थोपविण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 7 पासून विकेंड कर्फ्यूला सुरूवात झाली असली तरी शनिवारी व रविवारी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या कर्फ्यूच्या नियमावलीत याचा उल्लेख असून दोन्ही दिवस सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत.
गेल्या आठवडय़ात दोन दिवस पूर्णपणे विपेंड कर्फ्यू जारी करण्यात आला होता. रुग्णसंख्येत घट होत चालल्यामुळे विकेंड कर्फ्यूत शिथिलता आणण्यात आली आहे. शनिवारी व रविवारी दोन्ही दिवस सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिली आहे.
विकेंड कर्फ्यूच्या काळात उपचारासाठी जाणारे रुग्ण व त्यांच्या सोबत जाणाऱयांना मुभा असणार आहे. याबरोबरच लसीकरणासाठी जाणाऱयांनाही सवलत देण्यात आली आहे. दूध, भाजी, फळांची दुकाने दुपारी 2 पर्यंत उघडी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याबरोबरच किराणा दुकानेही दुपारपर्यंत उघडी असणार आहेत. रेशन दुकाने व दारू दुकानेही दुपारपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. बस, विमानसेवा सुरू असणार आहेत. 24 तास होमडिलिव्हरी सर्व्हिस सुरू असणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. कारखाने सुरू ठेवण्यास अनुमती देण्यात आली असली तरी कामगारांची संख्या किती असावी त्यावर मार्गसूची जारी करण्यात आली आहे.
कारखान्यात कामासाठी जाणाऱया कामगारांना आपले ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार आहे. याबरोबरच मांस व मच्छी विक्रीची दुकाने, डेअरी दुपारपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. फेरीवाल्यांसाठीही दुपारी 2 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास अनुमती आहे. विकेंड लॉकडाऊन पूर्णपणे असणार की मुभा असणार या विषयी सुरूवातीला संभ्रमावस्था होती.