देऊर येथे धाडसी चोरी; 27 तोळे सोने चोरीस, 21 हजारांची रोख रक्कमही लांबवली
वार्ताहर/ कोरेगाव
विकेंड लॉकडाऊन, संचारबंदी आणि वाढत्या गरमीचा फायदा उठवत देऊर येथील घरावर मोठी चोरी केली. देऊर (ता. कोरेगाव) येथील विकास तुकाराम कदम यांच्या राहत्या घरातून कपाट फोडून चोरटय़ांनी तब्बल 27 तोळे सोने व 21 हजारांची रोकड चोरीला गेली. लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र शांतता असताना चोरटय़ांनी साधलेला हा चोरीचा डाव वाठार पोलिसांना आव्हान देणारा असून चोरीच्या घटनेने देऊरमध्ये खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, देऊर येथे विकास तुकाराम कदम यांचे घर असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरातील सर्व सदस्य घराच्या स्लॅबवर झोपण्यासाठी गेले होते. अशावेळी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरांनी घराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाट फोडले. कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे मंगळसूत्र, पाटल्या, अंगठय़ा, मोहनमाळ, चेन, लक्ष्मीहार, बदाम असे विविध प्रकारचे तब्बल 27 तोळ्याचे दागिने चोरले, तसेच 30 भार वजनाचे चांदीचे दागिने व 21 हजारांची रोकड चोरून नेली. सकाळी हि चोरीची बाब लक्षात येताच याची खबर विकास कदम यांनी वाठार पोलिसांना दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि स्वप्नील घोंगडे यांनी घटनास्थळी भेट देवून तपासकामी पाहणी केली. तसेच ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विकास कदम यांनी वाठार पोलिसांत याबाबत फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनि स्वप्नील घोंगडे करीत आहेत.
सध्या विकेंड लॉकडावून सुरु असून रात्री संचारबंदी आहे त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ अगदीच नगण्य आहे. संचारबंदीत रात्री चौकाचौकात पोलिसांचा रात्र बंदोबस्त असून अशावेळी चोरांनी लॉकडाऊनमध्ये घर अनलॉक करीत केलेली मोठी चोरी पोलिसांना आव्हान देणारी आहे.
नागरिकांनी दक्ष रहावे
जिल्हय़ाचा पारा 40 अंशाकडे झेपावत असताना रात्रभर नागरिकांची घालमेल होत आहे. फॅन जरी रात्रभर सुरू ठेवला तरी नंतर गरम हवेमुळे झोप लागत नाही. त्यामुळे बरेच जण घराच्या बाहेर अंगणात, काही घराच्या स्लॅबवर झोपतात. तर काहींना पहाटे पहाटे गाढ झोप येते. याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न चोरटे करतात. त्यामुळे नागरिकांनी या काळात दक्ष राहणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.